लोकांची उधारी बुडावी म्हणून दीड लाखांना लुटल्याचा केला बनाव, उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना आली शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST2021-02-20T05:30:14+5:302021-02-20T05:30:14+5:30
जालना : लोकांची उधारी बुडावी म्हणुन त्याने दीड लाख रूपयांना लुटल्याचा बनाव करून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

लोकांची उधारी बुडावी म्हणून दीड लाखांना लुटल्याचा केला बनाव, उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना आली शंका
जालना : लोकांची उधारी बुडावी म्हणुन त्याने दीड लाख रूपयांना लुटल्याचा बनाव करून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना शंका आली. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता, लोकांची उधारी देता येत नसल्याने लुटमारीचा बनाव केल्याची कुबली त्याने दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
समीर पि. शेख जमिल (वय २८ , रा. दुखीनगर जालना) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.
समीर पि. शेख जमील हा व्यापारी आहे. त्याच्याकडे दीड लाख रूपयांची उधारी होती. गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन इसमांनी मारहाण करून चाकूने जखमी केले. त्यानंतर दीड लाख रूपयांना लुटल्याची खोटी तक्रार त्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसांनी व्यापारी समीर पि शेख जमिल याला विचारले असता, त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना शंका आल्याने त्याला पुन्हा विश्वासात घेऊन विचारले असता, लोकांची उधारी घेतली होती, ती उधारी देता येऊ नये म्हणून हा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली. पोलीस त्याची अधिक चौकशी करीत असून, खोटा गुन्हा दाखल करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली.
स्वत:च पाठीवर ब्लेडने केले वार
समीर पि. शेख जमील याने दोघांनी चाकूने वार करून जखमी केल्याचा बनाव केला होता. याबाबत त्याला पोलिसांनी विचारले असता, तो म्हणाला की, मी स्वत;च पाठीवर ब्लेडने वार केले होते. त्यानंतर कपड्यांची बॅग घेऊन पोलीस ठाणे गाठले असल्याचे त्याने सांगितले.
म्हणून केला बनाव
समीर पी. शेख जमील याच्याकडे लोकांची उधारी होती. ही उधारी देता येऊ नये, म्हणून त्याने लुटमारीचा बनाव रचला. लुटमारीनंतर लोक पैसे मागणार नाहीत, असे त्याला वाटत होते. त्यामुळेच हा बनाव रचला होता.