वृक्षारोपण जोमात, संगोपन कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:18+5:302021-08-28T04:33:18+5:30
विजय बावस्कर वरूड बु : पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेतून भंडारगड (ता. भोकरदन) ...

वृक्षारोपण जोमात, संगोपन कोमात
विजय बावस्कर
वरूड बु : पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्या संकल्पनेतून भंडारगड (ता. भोकरदन) येथील टेकडीवर लोकसहभागातून एक हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. थाटामाटात झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमानंतर या रोपांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागात फिरणाऱ्या जनावरांमुळे रोपांचे नुकसान होत असून, लागवड केलेल्या रोपांपैकी किती रोपे जगणार, असाच प्रश्न निर्माण होत आहे.
पर्यावरणाच्या संगोपनासाठी वृक्षलागवड आणि संगोपन महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदाल यांनी विविध विभागांना वृक्षलागवड आणि संगोपनाचा उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिंदाल यांच्या संकल्पनेनुसार भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत यांच्या पुढाकारातून जिंदाल यांच्या उपस्थितीत भंडारगड येथील उंच टेकडीवरील खड्डोबारायाच्या मंदिर परिसरात श्रमदानातून एक हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वृक्षलागवड मोहिमेत वरूड बु, मुर्तड, देहड तसेच परिसरातील लोकप्रतिनिधी, निसर्गप्रेमींनी भरभरून प्रतिसाद देत सहभाग नोंदविला होता. भरपावसात ही वृक्षांची लागवड मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर वृक्ष संगोपनाची प्रत्येकाने शपथदेखील घेतली होती.
थाटामाटात झालेल्या वृक्षलागवड मोहिमेनंतर या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे. वृक्षलागवड करतेवेळी संगोपनाची घेतलेली शपथही अनेकजण विसरले आहेत. या परिसरात बकऱ्यांसह इतर जनावरे चराई करतात. जनावरांच्या या चराईत अनेक रोपांचे नुकसान झाले आहे. उर्वरित रोपेही बेवारस अवस्थेत पडले आहेत. वृक्षसंगोपन ही काळाची गरज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ही रोपे जगवावीत, यासाठी विशेष मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
कोट
तालुका प्रशासनाने चांगला उद्देश समोर ठेवून वृक्षलागवड केली आहे. परंतु, लागवडीनंतर ही रोपे बेवारस अवस्थेत पडली आहेत. अनेक रोपांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे वृक्षलागवडीचा उद्देश यशस्वी होण्यासाठी या रोपांचे संगोपन होणे गरजेचे असून, यासाठी प्रशासकीय विभागाने पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी करावी.
दिलीप वाघ
फोटो