बियाणाच्या टंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळी सोयाबीनची लागवड करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:32+5:302021-01-08T05:40:32+5:30
जालना : शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांच्या टंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात सोयाबीनचे बीजोत्पादन घ्यावे, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा ...

बियाणाच्या टंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळी सोयाबीनची लागवड करा
जालना : शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांच्या टंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात सोयाबीनचे बीजोत्पादन घ्यावे, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सोयाबीन पैदासकार डॉ. एस. पी. म्हेत्रे यांनी केले आहे.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी विज्ञान मंडळाच्या २८१ व्या ऑनलाइन मासिक चर्चासत्रात ‘उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर म्हेत्रे बोलत होते. परभणी जिल्ह्यातील केहाळ येथील प्रयोगशील भुईमूग उत्पादक शेतकरी कृषिभूषण मधुकर घुगे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात सोनुने यांनी यंदाच्या खराब हवामानामुळे येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगून काही भागात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे उन्हाळी भुईमूग लागवडीस वाव असल्याचे ते म्हणाले.
उन्हाळी सोयाबीन पेरणी करताना कृषी विद्यापीठाने विकसित केलेले जे. एस.-९३-०५, फुले संगम यासह इतर वाणांचा वापर करावा, असे सांगून एस.पी. म्हेत्रे म्हणाले, पेरणी ११ ते २० जानेवारीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी थायरम किंवा ट्रायकोडर्मा ८ ते १० मि.लि. प्रतिकिलो व रायझोबियम आणि पी.एस.बी.- १०० मि.लि. प्रति १० किलो वापरून बीजप्रक्रिया करावी, यामुळे उत्पादनात वाढ होते. प्रतिएकरी २६ किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे, १५ ते २० दिवसांनंतर एक कोळपणी व खुरपणी करणे गरजेच असून, कमीत- कमी ६ ते ८ पाणी आवश्यक आहेत. खताची मात्रा ही ३० किलो नत्र, ६० किलो स्फूरद, ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावी. पांढरी माशी, तुडतुडे ही रस शोषणारी कीड, शेंगा पोखरणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफोनफोस किंवा सायपरमेथ्रीन २५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी हंगामात ५ ते ६ क्विंटल उत्पादन येऊ शकते, असेही डॉ. म्हेत्रे म्हणाले. याप्रसंगी रामदास वाघ, शंकर जाधव, रिता पाटील, नामदेव माथने, दिगंबर जाधव, लक्ष्मण उगले, सचिन कोरके, शंकर नागवे, विनोद कदम, अंकुश शिंदे, राहुल मानकर यांनी सोयाबीनसंदर्भातील शंकांचे निरसन केले.
चौकट
‘उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करताना कृषिभूषण मधुकरराव घुगे म्हणाले, उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. भाभा संशोधन संस्थेने विकसित केलेले टॅग-२४, टी टीजी-२६ अ, असे ९० ते ९५ टक्के उगवण क्षमता असलेले वाण वापरावे. भुईमूग उत्पादन हे एकरी झाडांची संख्या व त्याला लागणाऱ्या शेंगा यावर अवलंबून असते. या सर्व बाबींचा विचार करून एकरी ८० किलो बियाणे वापरल्यास उत्पादनात वाढ होते, असे ते म्हणाले. लागवडीसाठी दोन ओळींतील अंतर २५ सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० सें.मी. ठेवावे. भुईमूग बीज प्रक्रियेसाठी बुरशी नाशकाचा वापर करावा, असे मधुकरराव घुगे म्हणाले. राहुल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.