दोन वर्षात कुटुंब नियोजनाच्या सात हजारावर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:20+5:302021-02-10T04:31:20+5:30

जालना : आरोग्य विभागाच्या वतीने गत दोन वर्षात साडेसात हजारावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु, या दोन ...

Over seven thousand family planning surgeries in two years | दोन वर्षात कुटुंब नियोजनाच्या सात हजारावर शस्त्रक्रिया

दोन वर्षात कुटुंब नियोजनाच्या सात हजारावर शस्त्रक्रिया

जालना : आरोग्य विभागाच्या वतीने गत दोन वर्षात साडेसात हजारावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु, या दोन वर्षात केवळ १५ पुरूषांनी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. पूर्वीपासून सुरू असलेली पुरूषी मानसिकता आणि समाजात पसरलेले गैरसमज याला कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

आज प्रत्येक कुटुंबात कुटुंब नियोजनावर चर्चा होते. परंतु कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटलं की, महिलांचीच यात आघाडी दिसून येते. पुरूष नसबंदीबाबत अनेक गैरसमज असून, पुरूषी मानसिकताही कारणीभूत ठरत आहे. बिनटाका पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागाकडून अपेक्षित जनजागृती होताना दिसत नाही. लग्नानंतर एखाद दुसरे अपत्य झाले की, मुलांची जबाबदारी महिलेवर येऊन पडते. जेव्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची वेळ येते, त्यावेळीही पुढे हाेऊन महिलांना शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागतात. पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.

जालना जिल्ह्यात गत दोन वर्षात साडेसात हजारांवर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सन २०१९मध्ये झालेल्या ६,९१२ शस्त्रक्रियांमध्ये ६,९०० महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. केवळ १२ पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. गतवर्षी कोरोनामुळे कमी प्रमाणात म्हणजे १००३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यात १००० महिलांनी व केवळ तीन पुरुषांनी ही शस्त्रकिया केली आहे.

काय आहेत गैरसमज?

कुटुंब नियोजनासाठी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. परंतु, नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी बहुतांश पुरूष नकार देतात. नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरीरावर विपरित परिणाम होत असल्याचा गैरसमज समाजात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्याशिवाय पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रध्दा, पुरूषी मानसिकता याला कारणीभूत ठरत आहे.

आरोग्याचा प्रश्न

कुटुंब नियोजनासाठी नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर आरोग्यावर परिणाम होतो. वंध्यत्व येते. यासह इतर गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे खूप कमी पुरूष या शस्त्रक्रियेसाठी पुढे येतात. गैरसमजामुळेच अनेकजण नकार देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जनजागृती गरजेची

कुटुंब नियोजनासाठी पुरूषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घ्यावी, यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. शिवाय वेळोवेळी शिबिरेही घेतली जातात. परंतु, शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या समस्या आणि मिळणारे लाभ याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने विशेष जनजागृती करण्याची गरज आहे.

जिल्हा आरोग्य विभागाकडून जनजागृती

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते. पुरुषांनीही कुटुंब नियोजनासाठी नसबंदी शस्त्रक्रीया करावी, याबाबतही आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.

डॉ. विवेक खतगावकर- जिल्हा आरोग्य अधिकारी

एक नजर...शस्त्रक्रियांवर

वर्ष २०१९

६,९१२

६,९०० महिलांनी केली नसबंदी

१२ पुरुषांनी केली नसबंदी

वर्ष २०२०

१००३

१००० महिलांनी केली नसबंदी

०३ पुरुषांनी केली नसबंदी

Web Title: Over seven thousand family planning surgeries in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.