दरोडेखोर, चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 01:33 IST2020-02-20T01:33:15+5:302020-02-20T01:33:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करून रक्कम लुटण्याचे प्रकार मागील काही महिन्यांपासून शहर व परिसरात सुरू ...

दरोडेखोर, चोरट्यांचे पोलिसांना खुले आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करून रक्कम लुटण्याचे प्रकार मागील काही महिन्यांपासून शहर व परिसरात सुरू आहेत. घरफोड्या, वाहन चोऱ्यांचे सत्र तर थांबण्याचे नाव घेत नाही. पोलीस दलाकडून गस्तीत वाढ केल्याचे सांगितले जात आहे. मात्र घडणा-या घटनांमुळे व्यापा-यांमध्ये दहशत पसरली असून, सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी भर दुपारी औद्योगिक वसाहतीत घडलेल्या घटनेने यात आणखी भर घातली आहे.
उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या जालना शहरासह जिल्हाभरात गत काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषत: व्यापारी वर्गाला लक्ष्य केले जात असल्याचे असल्याचे दिसून येत आहे. यातील काही घटना पाहता जालना शहरातील गोपीकिशननगर भागात राहणारे पंकज बाबूलाल अग्रवाल हे १ आॅक्टोबर २०१९ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होते. बगडिया यांच्या नवीन प्लॉटिंगजवळील गेटजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी अडविली. अग्रवाल यांना फायटरने जबर मारहाण करीत त्यांच्याकडील रोख १ लाख ४१ हजार ३५० रूपये घेऊन पळ काढला.
३१ आॅक्टोबर रोजी व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर वन विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ अज्ञातांनी गावठी पिस्तूलमधून गोळीबार केला होता. या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या राजेश नहार यांचाही नंतर खून झाला होता. या खून प्रकरणात दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. मात्र, नेमका खून कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप समोर आलेले नाही.
९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी बुलडाणा अर्बन को. आॅप. सोसायटी लि.च्या मुख्य शाखेतून ३ लाख रूपये घेऊन गणेश कागणे व अरविंद देशमुख हे दोघे दुस-या शाखेत जात होते. नवीन मोंढा येथील मारूती मंदिराजवळ दुचाकीस्वार तिघांनी दोन्ही कर्मचा-यांना मारहाण करून ३ लाखांची रोकड लंपास केली होती. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले. मात्र, त्यांचा पत्ता पोलिसांना अद्याप लागला नाही. काही दिवसांपूर्वी १४ फेब्रुवारी रोजी रात्री व्यापारी रामेश्वर कौटकर हे औषधी दुकान बंद करून घराकडे जात असताना तिघांनी मारहाण करून ८१ हजारांची रोकड लंपास केली होती. तर दोन व्यापा-यांचे अपहरण झाल्याच्याही घटना आहेत.
व्यापा-यांना मारहाण करून लूटमारीच्या या घटनांसह इतर चो-या, घरफोड्या, वाहन चो-यांचे सत्र शहरासह जिल्ह्यात सुरूच आहे. त्यात पुन्हा शुक्रवारी १९ फेब्रुवारी रोजी औद्योगिक वसाहतीत भर दुपारी एकास मारहाण करून पावणेसहा लाखांची रोकड लंपास केली आहे. हे चोरटेही सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. मात्र, यापूर्वीच्या घटना पाहता हे चोरटे पोलिसांच्या हाती लागतील का, हा प्रश्न आहे.
तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळणार आहे, त्यासाठी रक्कम द्या म्हणून रोकड, दागदागिने लंपास करणारी टोळीही जालना शहरात सक्रिय झाली आहे. या चोरट्यांनी घरकुलाचा बनाव करीत गत काही महिन्यात तीन कुटुंबांची लूट केली आहे.
विना नंबरच्या वाहनांकडे दुर्लक्ष...
जालना शहर परिसरातील वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. त्यात लुटमारीच्या बहुतांश घटनांमध्ये दुचाकीचा वापर झाल्याचे चित्र आहे. तर रिक्षाचा वापर करून प्रवाशांची लूट केल्याच्याही घटना आहेत. त्यामुळे आरटीओसह वाहतूक शाखेने विना नंबरच्या दुचाकी पकडल्यानंतर सक्तीने कागदपत्रांचीच पाहणी करणे गरजेचे आहे. प्रवाशांची झालेली लूट पाहता प्रत्येक रिक्षाच्या कागदपत्राची माहितीही संकलित होणे गरजेचे आहे.
सुरक्षेबाबत व्यापारी, नागरिकांकडूनही दुर्लक्ष
लूटमारीच्या आजवरच्या घटना पाहता एकट्यानेच दुचाकीवरून रक्कम नेताना चोरट्यांनी लूटमार केली आहे. मोठी रक्कम नेताना घ्यावयाची दक्षता व्यापारी, नागरिकही घेत नसल्याचे चित्र आहे. हीच संधी साधून चोरटे लूटमार करीत असून, व्यापारी, नागरिकांनीही लाखोंच्या रकमा नेण्याऐवजी सुरक्षा बाळगण्यासह चेकद्वारे किंवा आॅनलाईन व्यवहार करणे गरजेचे झाले आहे.
जुगारासह दारूविक्रीही जोमात
पोलीस प्रशासनाकडून अवैध दारूविक्री, जुगारावर किरकोळ कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीची कदीम पोलिसांची कारवाई वगळता इतर एकही मोठी कारवाई झालेली नाही. त्यामुळे अवैध धंदे सर्रासपणे सुरूच आहेत. जुगाºयांसह दारूविक्रेत्यांवरही कारवाईची गरज आहे.