दोन दिवसात केवळ दोनच अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:42+5:302020-12-26T04:24:42+5:30
जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामनिर्देशन पत्र सादर दोन दिवसात केवळ दोनच उमेदवारांचे अर्ज ...

दोन दिवसात केवळ दोनच अर्ज दाखल
जालना : तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नामनिर्देशन पत्र सादर दोन दिवसात केवळ दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर असल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली.
२३ डिसेंबर पासून ग्रामपंचायतीसाठीचे नामनिर्देशनपत्र सादर करणे सुरू झाले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची डेडलाईन ३० डिसेंबर आहे. शुक्रवारी ख्रिसमसनिमित्त सुटी होती. तर नंतर शनिवार आणि रविवारीही सुटी राहणार आहे. त्यामुळे सुटीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. सुट्या वगळून आता केवळ तीन दिवस उमेदवारांच्या हाती राहिले आहेत. २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत ८६ ग्रामपंचायतीसाठी ७४० सदस्यांच्या जागेसाठी इच्छुकांना अर्ज भरावे लागणार आहेत. बहुतांश गावांमध्ये सरळ लढत होणार असली तरी अद्याप पॅनलमधील उमेदवार फिक्स न झाल्याने उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही.
ज्या उमेदवाराचा अर्ज भरत असलेल्या प्रभागाच्या यादीत नाव आहे हे त्यांना प्रमाणित प्रत वेगळी सादर करण्याची गरज नाही. त्यांच्या मतदार यादीच्या छायांकित प्रतीवर संबंधित टेबलवरील निवडणूक निर्णय अधिकारी हे पडताळणी करून तशी नोंद करणार आहेत. ज्या उमेदवाराचे नाव नामनिर्देशन भरत असलेल्या प्रभागाच्या मतदार यादीत नाही केवळ अशा उमेदवारांना मतदार यादीची प्रमाणित प्रत सादर करणे आवश्यक आहे. सदरील प्रमाणीत प्रत ही तहसीलमधील अभिलेख कक्षातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष यासाठी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार असल्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले.
सातवी पासची अट
१ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांनी सातवी पास असणे, ही अट घालण्यात आली आहे. त्यापूर्वी जन्मलेल्या उमेदवारांना ही अट बंधनकारक नाही. उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे.