जालन्यात ज्वालामुखी? व्हायरल व्हिडिओमागचं धक्कादायक सत्य आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:01 IST2026-04-07T12:00:51+5:302026-04-07T12:01:31+5:30

जमिनीत लाव्हा नव्हे, तांत्रिक बिघाड! महावितरणने सामनगाव रोडवरील 'त्या' व्हिडिओवर दिला स्पष्ट खुलासा.

No Volcano in Jalna: MSEDCL Clarifies Lava-like Substance Was Result of Electrical Fault. | जालन्यात ज्वालामुखी? व्हायरल व्हिडिओमागचं धक्कादायक सत्य आलं समोर!

जालन्यात ज्वालामुखी? व्हायरल व्हिडिओमागचं धक्कादायक सत्य आलं समोर!

जालना: शहरातील सामनगाव रोड परिसरात जमिनीतून लाव्हासारखा लालभडक पदार्थ बाहेर येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ५ एप्रिल रोजी नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. अनेकांनी हा ज्वालामुखी असल्याचा दावा केला होता, मात्र महावितरणने या घटनेमागील तांत्रिक बिघाडाचे सत्य समोर आणले आहे. हा कोणताही नैसर्गिक चमत्कार नसून, विद्युत खांबावरील तांत्रिक दोष आणि खडकाळ जमिनीमुळे घडलेला प्रकार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून हा बिघाड दुरुस्त केला असून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.

हाय व्होल्टेज प्रवाहामुळे वितळले खडक
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, सामनगाव रोडवरील ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर तांत्रिक बिघाडामुळे 'व्ही-क्रॉस आर्म' आणि 'आरएसजे पोल'च्या संपर्कात आला. यामुळे उच्च दाबाचा विद्युत प्रवाह पोलमधून थेट जमिनीत उतरला. ज्या ठिकाणी हा विद्युत प्रवाह उतरला, ती जागा अत्यंत खडकाळ आहे. अपुऱ्या अर्थिंगमुळे आणि विद्युत प्रवाहाच्या प्रचंड तीव्रतेमुळे तिथे मोठी उष्णता निर्माण झाली. या उष्णतेने तेथील खडक वितळले आणि ते लाव्हासारखे लालभडक दिसू लागले. नागरिकांनी याच दृश्याचा व्हिडिओ बनवून तो ज्वालामुखी म्हणून व्हायरल केला होता.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महावितरणने संयुक्तपणे कारवाई केली. रविवारी सायंकाळी ४:४५ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. "हा केवळ तांत्रिक दोष होता, कोणतीही नैसर्गिक आपत्ती नाही," असे महावितरणचे प्र. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन घुलाने यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील सर्व विद्युत खांबांची नव्याने अर्थिंग केली जाणार आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही भीतीदायक अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title : जालना 'ज्वालामुखी' वीडियो: वायरल घटना के पीछे का सच आया सामने

Web Summary : जालना में 'ज्वालामुखी' वीडियो उच्च-वोल्टेज बिजली की खराबी थी, प्राकृतिक नहीं। गर्म चट्टानें पिघलकर लावा जैसी दिखीं। बिजली बहाल; सोशल मीडिया अफवाहों से बचें।

Web Title : Jalna 'Volcano' Video: Truth Revealed Behind Viral Incident

Web Summary : Viral Jalna 'volcano' video was high-voltage electrical fault, not natural. Overheated rocks melted, mimicking lava. Power restored; avoid social media rumors.