खासगी शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:57+5:302021-09-03T04:30:57+5:30
विजय मुंडे जालना : शिक्षकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापपर्यंत ...

खासगी शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती मिळेना
विजय मुंडे
जालना : शिक्षकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत; परंतु अद्यापपर्यंत केवळ नऊ हजार ४२९ शिक्षकांनी लसीकरण करून घेतले आहे. विशेषत: खासगी शाळांमधील सहा हजारांवर शिक्षकांच्या लसीकरणाची माहिती अद्याप जिल्हा परिषदेकडे अप्राप्त आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळेला कुलूपच लागले होते. विशेषत: दहावी, बारावीच्या परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारे गुणदान करण्यात आले आहे. कोरोनाच्या कालावधीत मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याची तयारी शासनस्तरावरून करण्यात आली. त्याचवेळी शिक्षकांनी वेळेत लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. माध्यमिकच्या शाळा सुरू करताना शिक्षकांच्या लसीकरणासह कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. त्यात आता प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याची तयारी शासन करीत असून, शिक्षकांचे लसीकरण विशेष ड्राइव्ह राबवून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेकडूनही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची माहिती संकलित केली जात आहे. जिल्ह्यातील १६ हजारांवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी केवळ ११ हजार ९६८ जणांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यात १० हजार ८०५ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर ११६३ जणांचे लसीकरण झालेले नाही. यात १० हजार ३५९ शिक्षकांपैकी ९ हजार ४२९ शिक्षकांचे लसीकरण झाले आहे, तर ९३० जणांचे लसीकरण झालेले नाही. १६०९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १४०७ जणांचे लसीकरण झाले आहे, तर तर २०२ जणांचे लसीकरण झालेले नाही. विशेष म्हणजे अद्याप सहा हजारांवर शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचीच माहिती प्राप्त झालेली नाही. वेळोवेळी सूचना देऊनही माहिती न देणाऱ्या शिक्षकांसह संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोट
शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजवर दहा हजार ८०५ जणांच्या लसीकरणाची माहिती उपलब्ध झाली आहे. उर्वरित शिक्षकांसह संबंधित शाळा, संस्थांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, लसीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित शिक्षक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण वेळेत होईल.