स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:30 IST2018-01-08T23:30:38+5:302018-01-08T23:30:47+5:30
स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांची बैठक सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली.

स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा
जालना : आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केले.
स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांची बैठक सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, सर्व विषय समित्यांचे सभापती आणि नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती. गोरंट्याल म्हणाल्या की, पदभार स्वीकारल्यानंतर आपण प्रथम प्राधान्य स्वच्छतेच्या कामाला दिले. पालिकेकडे उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी आवश्यक प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व्यापारी, उद्योजक, सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी पुढाकार घेऊन काम करावे. मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण राबवण्यामागील उद्देश सांगून सर्वेक्षण यशस्वीपणे राबवण्यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बैठकीत उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांनी उपयुक्त सूचना मांडल्या.