लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : अंबड व घनसावंगी तालुक्यात मोसंबी विमा वाटपात कंपनीने मोठा गोंधळ केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गोंधळाच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीर्थपुरीत रस्ता रोको आंदोेलन केले. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.तीर्थपुरी व अंतरवाली टेंभी येथील जिल्हा बँकेच्या दोन्ही शाखेत तीर्थपुरी, गोंदी, सुखापुरी व अंतरवाली टेंभी या महसूल मंडळाअंतर्गत येणा-या गावातील ८०७ मोसंबी उत्पादक शेतक-यांनी हवामान आधारावर टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीकडे जून २०१८ मध्ये हेक्टरी ३,८५० प्रमाणे विम्याचा भरणा केला होता.त्यापैंकी केवळ २८५ शेतक-यांना हेक्टरी ७७ हजार रुपये मंजूर झाले. तर ५२२ शेतक-यांना कोणतेही कारण न देता विमा दिला नाही. तसेच हजारों शेतक-यांनी आॅनलाईन विमा भरला होता. मात्र, त्यांच्याही खात्त्यात अद्यापही पैसे जमा झाले नाही. या सर्व शेतक-यांचे पैसे विमा कंपनी त्वरीत खात्यात जमा करावे, या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन मंडळाधिकारी एस. टी. साळवे यांना देण्यात आले.
तीर्थपुरीत रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:50 IST