Movement for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी मनोऱ्यावर चढून आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मनोऱ्यावर चढून आंदोलन

अंबड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी अंबड येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले.

मराठा समाज आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने समाजावर अन्याय झाला आहे. त्यात शासन नोकरभरती करण्याची घाई करीत आहे. शासनाने अगोदर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकर भरती करू नये, आदी मागण्यांसाठी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी अंबड शहरातील नगर परिषद कार्यालयाजवळ असलेल्या बीएसएनएलच्या मनोऱ्यावर चढून आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार बाबुराव चंडोल यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्या तातडीने शासनापर्यंत पोहोचवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संतोष जेधे, जिल्हाध्यक्ष देवकर्ण पाटील, राधाकिसन शिंदे, संदीप ताडगे, शिवनाथ काळवणे, राधेशाम पवार, तुळशीराम टाकसार, उमेश गव्हाणे, बंटी गायकवाड, आकाश थेटे, योगेश पाटील, बाळासाहेब इंगळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Movement for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.