कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविताना आईही पाण्यात पडली; मुलाचा मृतदेह आढळला

By विजय मुंडे  | Updated: May 5, 2023 13:54 IST2023-05-05T13:54:12+5:302023-05-05T13:54:41+5:30

मायलेकरू बुडाले जायकवाडीच्या डाव्या कालव्यात

Mother also fell into the water while rescuing the toddler who had fallen into the canal; The body of the child was found | कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविताना आईही पाण्यात पडली; मुलाचा मृतदेह आढळला

कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविताना आईही पाण्यात पडली; मुलाचा मृतदेह आढळला

वडीगोद्री (जि.जालना) : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईही पाण्यात पडली. या घटनेत पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाला. प्रशासकीय शोध मोहिमेत शुक्रवारी सकाळी मुलाचा मृतदेह आढळला असून, रात्री उशिरापर्यंत त्या महिलेचा शोध सुरू होता. ही घटना बुधवारी सायंकाळी दह्याळा (ता.अंबड) शिवारात घडली. सार्थक रवींद्र गारुळे (वय-०९ रा. दह्याळ ता.अंबड) असे मयत मुलाचे नाव आहे. त्याची आई वंदना रवींद्र गारुळे (वय-३५) यांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

दह्याळा येथील वंदना रवींद्र गारुळे ह्या त्यांचा मुलगा सार्थक याला घेऊन बुधवारी सायंकाळी जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सार्थक अचानक पाण्यात उतरला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात होता. त्याला वाचविण्यासाठी आई वंदना या कालव्यात उतरल्या. परंतु, दोघेही पाण्यात बुडाले. बऱ्याच वेळ होऊनही धुणं धुण्यासाठी गेलेली पत्नी-मुलगा घरी परत आला नाही. त्यामुळे रवींद्र गारुळे हे कालव्याकडे गेले. त्यांना कालव्याच्या वर धुण्यासाठी नेलेले कपडे आणि चपला आढळून आल्या. त्यामुळे माय-लेकरू कालव्यात बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने नातेवाइकांना माहिती देऊन शोधमोहीम सुरू केली. मुलगा सार्थक याचा अंतरवाली सराटी शिवारात कालव्याच्या पाण्यात तरंगणारा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. वंदना गारुळे यांचा गुरुवारी रात्रीपर्यंत शोध लागला नव्हता. मयत मुलाचे शवविच्छेदन वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून अंत्यविधी करण्यात आला. या घटनेची गोंदी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, दह्याळा गावावर शोककळा पसरली आहे.

अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस स्टेशनचे सपोनि. सुभाष सानप यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन घटनास्थळाला भेट दिली. शिवाय उपस्थित नागरिक, आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पोलिसांनीही त्या महिलेचा शोध घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु, गुरुवारी रात्रीपर्यंत शोधमोहिमेला यश आले नव्हते.

Web Title: Mother also fell into the water while rescuing the toddler who had fallen into the canal; The body of the child was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.