कोरोनाकाळात वजन संतुलनावर अधिकचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST2021-05-26T04:30:54+5:302021-05-26T04:30:54+5:30
जालना : कोरोना काळामध्ये वजन वाढू न देण्याला डॉक्टरांसह नागरिकांनीही दक्षता बाळगली. रुग्णसंख्या वाढल्याने धावपळ झाली; परंतु यावर ...

कोरोनाकाळात वजन संतुलनावर अधिकचे लक्ष
जालना : कोरोना काळामध्ये वजन वाढू न देण्याला डॉक्टरांसह नागरिकांनीही दक्षता बाळगली. रुग्णसंख्या वाढल्याने धावपळ झाली; परंतु यावर उपाय म्हणून आहार, व्यायाम आणि आराम ही त्रिसूत्री पाळल्याने वजन नियंत्रित ठेवता आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनामुळे रात्री-अपरात्री रुग्ण दवाखान्यात येत असत. त्यामुळे पुरेशी झोप होत नव्हती. याचा परिणाम ॲसिडिटी वाढण्यासह एकूणच जीवनशैलीवर झाला होता; परंतु हे प्रारंभीचे दोन, तीन महिने चालले. यावर उपाय म्हणून जवळपास सर्वच डॉक्टरांनी एक ठरावीक वेळ रुग्णांसाठी राखून ठेवली आणि असलेला मोबाईल काही काळ बंद ठेवण्याला प्राधान्य दिले.
आहाराची घेतात काळजी
कोरोनाकाळात तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून सकस आहाराला सर्वांनीच महत्त्व दिले. त्यात विशेष करून अ जीवनसत्त्वाकडे लक्ष दिले.
प्रतिकारशक्ती वाढीमध्ये मांसाहार हा पोषक असल्याचे सांगितले गेले. परंतु प्रत्येकालाच हे शक्य नसल्याने भाजीपाला, फळे, दूध यांवर भर दिला.
डॉक्टरांची ड्यूटी ही २४ तास असते. कधी कुठला रुग्ण येईल, हे माहीत नसते. त्यामुळे अल्प आहार घेऊन सतर्क राहण्याला महत्त्व दिले. यात उपवास टाळण्यावरही अनेकांनी भर दिला होता.
कोरोनामुळे रुग्णसंख्या वाढल्याने डॉक्टरांनाही तीन शिफ्टमध्ये काम करावे लागले. तसेच नियमित स्वच्छतेपेक्षा अधिकच्या स्वच्छतेवर भर दिला.
तीन शिफ्टमध्ये काम करताना पूर्वीपेक्षा जादा कामाचा ताण आलेला आहे. हा ताण कमी करण्यासाठी योगसाधनेला देखील महत्त्व दिले.
डॉक्टर म्हटले की, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. रुग्णसेवेमुळे डॉक्टरांना समाजात मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते. अशातच डॉक्टरांना स्वत:च्या आरोग्याची काळजी ही अधिक प्रमाणावर घ्यावी लागते. नियमित व्यायाम, नियंत्रित आहार आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवावे लागते. अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया करताना तुमच्या मनाची एकाग्रता खूप महत्त्वाची असते.
- डॉ. सुरेश साबू
कोरोनाकाळात महिलांनाही वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागले. अनेक वेळा प्रसूतीसाठी देखील वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये जाण्याची वेळ आली होती. अशावेळी महिला डॉक्टरांची देखील मोठी कसरत होत होती. कोरोनाला दूर ठेवून रुग्णांवर आवश्यक ते उपचार करणे महत्त्वाचे होते.
- डॉ. अनिता तवरावाला
कोरोनामध्ये डॉक्टरांच्या एकूणच जीवनशैलीवर परिणाम झाला आहे. अधिक काळ रुग्णांची तपासणी करावी लागते. यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ते होऊ नये म्हणून सकाळी व्यायाम आणि चालण्याला महत्त्व देऊन वजन नियंत्रित कसे राहील, यावर आपण भर देत आहोत.
- डॉ. रवींद्र देशमुख