पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाच्या बतावणीत आणखी बडे मासे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 16:43 IST2021-06-12T16:43:16+5:302021-06-12T16:43:38+5:30
हिवरखेडा येथून उपजीविका भागविण्यासाठी किसन पवार हा पुणे येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी गेला होता. तेथे त्याने आपण मांत्रिक असल्याचे सांगून अनेकांना भुलविले.

पैशांचा पाऊस पाडणाऱ्या भोंदूबाबाच्या बतावणीत आणखी बडे मासे...
जालना : विशेष पूजा करून आपण पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करून पुण्यातील एका व्यापाऱ्याला चक्क ५२ लाख रुपयांना लुबाडले. याप्रकरणी मंठा तालुक्यातील हिवरखेडा येथील संशयित भोंदूबाबा किसन पवार याला पुणे पोलिसांनी २ जूनला अटक केली. त्याचा तपास सध्या सुरू असून, या भामट्याने आणखी जवळपास सात ते आठ नागरिकांना असेच लुबाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिवरखेडा येथून उपजीविका भागविण्यासाठी किसन पवार हा पुणे येथे दोन ते तीन वर्षांपूर्वी गेला होता. तेथे त्याने आपण मांत्रिक असल्याचे सांगून अनेकांना भुलविले. त्याच्या या बतावणीला अनेक बडे व्यापारी आणि शिक्षित नागरिकही बळी पडले. पुण्यातील एका व्यापाऱ्यास विशेष पूजा केल्यास पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून त्याची दिशाभूल केली. या भोंदूबाबाच्या थापेला हा व्यापारी बळी पडल्याने त्याचे ५२ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही बाब कळताच सदरील व्यापाऱ्याने पोलीस ठाणे गाठले होते. पुणे येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास आल्याने पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमृता चौरे यांच्याकडे आल्यावर त्यांनी हिवरखेडा गाठून संशयित किसन पवारला अटक केली.
या घटनेला आता आठवडा लोटला आहे.
या भोंदूबाबाच्या तपासाबद्दल चौरे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, पुण्याप्रमाणेच आसपासच्या अनेक गावांत पवार याने सात ते आठ श्रीमतांना गंडा घातल्याचे दिसून येत आहे. तपासात त्याच्याकडून ज्यांची नावे आणि पत्ते मिळाले आहेत, तेथे आम्ही जाऊन आलो. तेथेही या भाेंदूबाबाने पैशाचा पाऊस पाडण्यासह गुप्तधनाची लालूच दाखविली. आम्ही सध्या या बाबींचा तपास करत असल्याने नेमके कोणाकडे गेलो, कोणकोण त्याच्या जाळ्यात अडकले आहेत. हे आताच जाहीर करू शकत नसल्याचे चौरे यांनी सांगितले.
बनावट नोटांच्या वापराने पितळ उघडे
आपण विशेष पूजा करून पैशांचा पाऊस पाडतो, अशी बतावणी करत, हिवरखेडा येथील किसन पवार याने पैशांचा पाऊस एका व्यापाऱ्याच्या घरात पाडला देखील; परंंतु त्या पावसासाठी वापरलेल्या नोटा या बनावट असल्याचे व्यापाऱ्यांच्या नंतर लक्षात आले. त्या आधी पवार याने संबंधित व्यापाऱ्याकडून ५२ लाख रुपये उकळले होते.