भाव घसरल्याने जालन्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:03 IST2018-05-26T14:03:26+5:302018-05-26T14:03:26+5:30
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. परंतु, दिवसेंदिवस घसरत चाललेल्या दुधाच्या दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे.

भाव घसरल्याने जालन्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत..!
जालना : शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. परंतु, दिवसेंदिवस घसरत चाललेल्या दुधाच्या दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांचा प्रपंच दुधावर चालतो. परंतु, गायीची देखभाल करणे, चारा उपलब्ध करणे, याचा खर्च वसूल होत नसल्याने ते अडचणीत सापडले आहे.
सध्या उन्हाळा सुरू असून, पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतात पिके न घेता गायींसाठी चाऱ्यांची लागवड करून चार ते पाच गायींचा सांभाळ करतात. त्यामुळे घरखर्च व गायींना लागणाऱ्या चाऱ्यांचा खर्च निघत होता. परंतु, अनेक महिन्यापासून दूध १५ ते २० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. त्यामुळे गायींना लागणारा खुराक, दवाखाना, औषधी, ढेप, कडबा, ऊसाचा खर्च यातून वसूल होत नाही. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे. हे दूध ३० ते ३५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले तर दूध उत्पादक शेतकरी कर्जमुक्त होईल, अन्यथा कर्जबाजारी व्हायला वेळ लागणार नाही. सरकारने दुधाचे भाव वाढवावे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
मागणी वाढली : दुधाचे पदार्थ महागले
दुधाचे भाव कमी झाले असले तरी दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थाच्या वाढलेल्या किंमती मात्र, कमी झालेल्या नाही. श्रीखंड, दही, ताक, पनीर, बर्फी यांच्या किमंती दूधा पेक्षा अधिक आहे. त्यामुळे यांच्याही किंमती कमी करण्यात याव्यात, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
गायींच्या किंमती घसरल्याने नुकसान
मी दररोज २५ ते ३० लिटर दूध विकतो. मला हे दूध मोटार सायकलवरून घेऊन जावे लागते. दुधाचे भाव चांगले होते. तेव्हा मला काही अडचण नव्हती. पण दुधाचे भाव घसल्याने मी अर्थिक संकटात सापडलो आहे.
- रामेश्वर आर्दड,दूध उत्पादक शेतकरी
माझ्याकडे पाच गायी आहे. त्यांना दररोज सहाशे ते सतशे रुपयांचा चारा लागतो. परंतु, दुधाचे भाव घसरल्याने हा चारा विकत घेण्यासाठीच पैसे उरत नाही. त्यामुळे सरकारने दुधाचे भाव तातडीने वाढवावेत.
- रामभाऊ पवळ, दुध उत्पादक शेतकरी