२५ एकरांत साकारतेय स्मृती उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:50 IST2018-04-02T00:33:01+5:302018-04-02T11:50:02+5:30
मोती तलावाच्यावरील बाजूस सर्वे क्रमांक ५०३-५०६ मध्ये पंचवीस एकरात नगरपालिकेच्यावतीने ‘स्मृती उद्यान ’ विकसित केले जात आहे.

२५ एकरांत साकारतेय स्मृती उद्यान
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मोती तलावाच्यावरील बाजूस सर्वे क्रमांक ५०३-५०६ मध्ये पंचवीस एकरात नगरपालिकेच्यावतीने ‘स्मृती उद्यान ’ विकसित केले जात आहे. हे उद्यान जालनेकरांसाठी वरदान ठरणार आहे.
शहरी भागातील वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावणाचा समतोल ढासाळत असून, याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची संख्याही अधिक असणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून अटल अमृत योजनेतून शहरी भागात हरित क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जालना नगरपालिकेने शहरात हरित क्षेत्राचा विकास करण्याचा आराखडा तयार केला होता.
या आराखड्यास अटल अमृत योजनेअंतर्गंत सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पैकी २४ लाख रुपये पालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत. प्राप्त निधीतून मोती तलावाच्यावरील बाजूस असलेल्या २५ एकर शासकीय जागेवर स्मृती उद्यान उभारण्याचे काम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. उद्यानात झोन निहाय हरित पट्टे विकसित केले जाणार आहेत. रेल्वे रूळाला लागून असलेल्या या भागात सध्या वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम प्रगतीपथावर असून, उंच वृक्षही आणण्यात आले आहेत. आवश्यक तिथे जमिनीचे सपाटीकरण केले जात आहे. उद्यानाचा भाग मोती तलावाला लागूनच असल्याने येथील कामांसाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. दरेगाव वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांना या उद्यानामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या परिसरातील सर्व अतिक्रमणही काढण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
जालना : उद्यानात जालनेकरांसाठी असणार विविध सुविधा
अहमदनगरच्या आर. एस. मांडे एजन्सीच्या माध्यमातून स्मृती उद्यान विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. उद्यानाच्या संपूर्ण परिसराला तार कंपाऊंड करण्यात आले आहे. उद्यानात मोठी झाडे लावण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने मोठे खड्डे खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे. काळी माती व शेणखत टाकून खड्ड्यांमध्ये उंच झाडांची लागवड केली जाणार आहे. स्मृती उद्यानात लॉन्स, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसाठी विशेष सुविधा असणार आहेत. तसेच फिरण्यास येणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्मृती उद्यान शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरणार आहे.