Matruvandana Yojana; 12 thousand 9 47 women get benefit | मातृवंदना योजना; १२ हजार ९४७ महिलांना मिळाला लाभ
मातृवंदना योजना; १२ हजार ९४७ महिलांना मिळाला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केली. आठही तालुक्यातील १२ हजार ९४७ लाभार्थ्यांची नोंदणी करुन त्यांना ३ कोटी ७५ लाख रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
भारत सरकारव्दारे चालविण्यात येणारा एक मातृत्व लाभ कार्यक्रम म्हणून महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृवंदना योजना २०१७ पासून राबविली जात आहे. भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता समाजातील मोठा घटक मोलमजूरी करुन जगत आहे. घरातील महिला व पुरुष दोघेही मोलमजुरी करतात. परंतु गर्भधारणेच्या अवस्थेत महिलेला काम करताना अडचणी येत असल्यामुळे ती काम करु शकत नाही. त्यामुळे परिवारातील आर्थिक स्थिती खालावते. अशा स्थितीत या परिवाराला मदत मिळावी आणि जन्म आणि बालसंगोपनाला हातभार लागावा याकरिता ही योजना पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहकारिता योजना, या नावाने सुरु करण्यात आली होती. आता ही योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या नावाने सुरु आहे. १९ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला या योजनांच्या लाभार्थी असून या योजनेंतर्गत सरकारने ५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गावातील महिलांना मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका प्रयत्नरत आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आर्थिक हातभार लागत आहे.
तीन हप्त्यांमध्ये मिळतोच लाभ
या योजनेचा लाभ तीन हप्त्यांत मिळत असून, या लाभाकरिता लाभार्थ्याचे व त्यांच्या पतीचे अद्ययावत आधारकार्ड हे बँक खात्याशी संलग्न असावे. पहिल्या हप्त्यात १ हजार रुपयांकरिता लाभार्थ्यांना मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता २ हजार रुपयाचा असून गर्भधारणेपासून सहा महिन्याच्या आत कमीत कमी एक तपासणी केल्यानंतर मिळतो. तिसरा हप्ता २ हजार रुपयांचा असून, यासाठी प्रसुतीनंतर नोंद करणे गरजेचे आहे.
१५०२ आशा वर्कर्स करतातय काम
यासाठी जिल्हाभरात १ हजार ५०२ आशा वर्कर्स मार्फत ही योजना राबविली जाते. या आशा वर्कर्स प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन योजनेविषयी माहिती देतात. तसेच त्यांच्याकडून तीन फॉर्म भरुन घेतात.


Web Title: Matruvandana Yojana; 12 thousand 9 47 women get benefit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.