लेहा येथे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:35 IST2019-02-11T00:34:49+5:302019-02-11T00:35:28+5:30
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी लेहा येथे घडली

लेहा येथे विवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
लेहा : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी लेहा येथे घडली. सीमा रामसिंग घुनावत (२७) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
सीमा हिचा विवाह २०१४ मध्ये लेहा येथील रामसिंग घुनावत याच्याशी राजपूत समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. काही वर्षे चांगला संसार केल्यानंतर रामसिंग याने दारुच्या नशेत मारहाण करुन मानसिक व शारीरिक छळ करण्यात सुरुवात केल्याने सीमा कंटाळून गेली होती. मात्र आपल्या एक वर्षाच्या मुलीचे कसे होईल, या चिंतेने त्रास सहन केला. याबाबत सीमाच्या आईवडील आणि नातेवाईकांनी रामसिंग याला समजावून सांगितले होते. मात्र त्रास कमी झाला नव्हता. रविवारी सकाळी रामसिंग आणि सीमामध्ये भांडण झाले. सीमाने रागाच्या भरात घरुन निघून गट क्रमांक २८८ मध्ये स्वत:च्या शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीमाचे शवविच्छेदन करण्यात आले.
मंगळवारी होणार होता घटस्फोट
रविवारी सीमा हिच्या चुलत भावाचा कुंकवाचा कार्यक्रम होता. त्यानंतर सीमा हिचा १२ फेब्रुवारी घटस्फोट घेण्याचे ठरले होते. मात्र त्या आधीच सीमाने आपली जीवनयात्रा संपवली.