Maratha Reservation : जालन्यात अर्धनग्न आंदोलन, तर साष्टपिंपळगाव येथे आदोलाकांनी महामार्ग अडवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:54 IST2021-05-05T15:53:44+5:302021-05-05T15:54:47+5:30
Maratha Reservation: गोंदी पोलीस ठाण्यात जावून शेकडो आंदोलकांनी ठिय्या मांडला होता.

Maratha Reservation : जालन्यात अर्धनग्न आंदोलन, तर साष्टपिंपळगाव येथे आदोलाकांनी महामार्ग अडवला
जालना : राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द ठरल्यानंतर जालना येथे मराठा महासंघाच्यावतीने मंगळवारी अर्धनग्न आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव ग्रामस्थांनी पैठण फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले.
जालना येथील मराठा महासंघाच्या वतीने अशोक पडूळ, संतोष गाजरे, सतीश देशमुख संतोष कऱ्हाळे व इतरांनी मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ अर्धनग्न आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविला. या आंदोलकांना कदीम पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरक्षणासाठी जवळपास तीन महिने उपोषण करणाऱ्या साष्टपिंपळगाव (ता.अंबड) येथील ग्रामस्थांनीही मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. औरंगाबाद- सोलापूर महामार्गावरील पैठण फाट्यावर आंदोलन केले. त्यानंतर गोंदी पोलीस ठाण्यात जावून शेकडो आंदोलकांनी ठिय्या मांडला होता.