'आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे', मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू
By विजय मुंडे | Updated: January 25, 2025 11:36 IST2025-01-25T11:36:00+5:302025-01-25T11:36:30+5:30
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू

'आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे', मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू
जालना : मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे शनिवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सगेसोयरेचा अध्यादेश काढून २६ जानेवारी रोजी एक वर्ष होत आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणत्र देण्याचा जीआर काढावा, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना मिळालेल्या सागेसोयऱ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, न्या. शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ द्याची, प्रमाणपत्र वाटपासाठी कक्ष सुरू करावे, शिंदे समितीला उर्दू, फारशी, मोडीलिपीचे अभ्यासक द्यावेत, ज्यांच्या नोंदी असूनही प्रमाणपत्र दिलेले नाही त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. हैदराबाद संस्थानचे गॅझेट, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी द्या
संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या सर्व आरोपितांना फाशीची शिक्षा व्हावी, गुंडगिरीचा नायनाट करावा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील सर्व मागणीही पूर्ण कराव्यात. संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत आपण लढा देणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.