मनोज जरांगे Exclusive: "आम्ही हक्कांसाठी लढतोय; यावेळी ५ पट समाज मुंबईत धडकणार!"

By विजय मुंडे  | Updated: August 26, 2025 13:25 IST2025-08-26T13:22:46+5:302025-08-26T13:25:52+5:30

सरकारने समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे

Manoj Jarange Exclusive: "We are fighting for rights; this time 5 times the society will strike in Mumbai!" | मनोज जरांगे Exclusive: "आम्ही हक्कांसाठी लढतोय; यावेळी ५ पट समाज मुंबईत धडकणार!"

मनोज जरांगे Exclusive: "आम्ही हक्कांसाठी लढतोय; यावेळी ५ पट समाज मुंबईत धडकणार!"

जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु सरकार समाजाच्या भावनांशी खेळत आहे. आज हा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून, राज्यातील घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार आहे. मागील वेळेपेक्षा पाच पट अधिक समाज राहणार असून, सरकारने समाजाच्या मागणीला गांभीर्याने घ्यावे, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

प्रश्न : आपली नेमकी मागणी काय आहे?
उत्तर : मराठा आणि कुणबी एक आहे, असा जीआर काढावा. हैदराबाद, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्न्मेंट, औंध संस्थानचे गॅझेट लागू करावे. दाखल सर्व गुन्हे घ्यावेत. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी आणि शासकीय निधी द्यावा आदी प्रमुख मागण्या आहेत.

प्रश्न : सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसे शक्य आहे?
उत्तर : पूर्वी व्यवसायानुसार नागरिकांच्या नोंदी सरकारी दप्तरी घेतल्या जात होत्या. मराठा समाज शेती करायचा. त्यांना शेतकरी नाही तर कुणबी म्हटलं जायचं. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थानसह इतर गॅझेटमध्ये तशा नोंदी आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या त्या नोंदी असून, त्या सरकारने मान्य करणे गरजेचे आहे. मागासवर्गीय आयोगानेही त्या नोंदी ग्राह्य धरून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे गरजेचे आहे; परंतु आमच्यावर अधिक अन्याय तिथेच झाला आहे.

प्रश्न : आजवर तीन वेळा असे आरक्षण न्यायालयाने नाकारले आहे, तरीही पुन्हा तोच आग्रह का?
उत्तर : आम्ही तेच म्हणतोय, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय मागासवर्गीय आयोग ५० टक्क्यांच्या वर आरक्षण जाऊ नये, असे सांगते. त्यामुळे आम्हाला ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण हवे आहे. कुणबी आरक्षणात आहेत. मराठा आणि कुणबी एकच असून, ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं आहे.

प्रश्न : मुंबईला जाण्यासाठी नेमके सणासुदीचे दिवस का निवडले?
उत्तर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपण इंग्रजांविरुद्ध लढलो. त्या लढ्यात इंग्रजांविरुद्ध नागरिकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यास सुरुवात झाली. आम्ही गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं, सरकारला सद्बुद्धी मिळावी, यासाठी लालबागच्या राजाला साकडं घालण्यासाठी जात आहोत. सणात अडथळा होईल, असे वाटत असेल तर आझाद मैदानावर जाण्यासाठी आम्हाला एक रस्ता मोकळा करून द्यावा.

प्रश्न : या मोर्चात किती लोक येतील असा अंदाज आहे?
उत्तर : गोरगरीब मराठा समाज पिचलेला आहे. आरक्षणाचा लढा आता तीव्र झाला असून, गावागावांतून तयारी सुरू आहे. गतवेळीपेक्षा यावेळी किमान पाच पट अधिक समाजबांधव येेतील. नव्हे, त्याचे गणितही लावता येणार नाही.

प्रश्न : सर्वांची व्यवस्था कशी आणि कोण करणार?
उत्तर : मराठा समाजातील प्रत्येक घरातून मुंबईला जाण्याची तयारी सुरू आहे. वाहने, जेवण यासह इतर सर्व व्यवस्था समाजबांधवच करीत आहेत.

प्रश्न : छगन भुजबळ म्हणतात, तुमची मागणी न्यायसंगत नसताना, लढा कशाला?
उत्तर : ओबीसींचे नेतृत्व करणाऱ्यांनाच काही कळत नाही. काही ओबीसींना कशा सुविधा आहेत आणि इतर ओबीसींना कशा आहेत ते त्यांनी सांगावे. राजकीय स्वार्थासाठी सर्वच ओबीसी समाज एका बाजूला पळवीत आहेत. हिंमत असेल त्या नेत्याने धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरावी. गरीब ओबीसी समाजाने त्यांचे डाव ओळखले आहेत. राज्यातील धनगर समाज असो किंवा ओबीसी समाज असो, हा मराठ्यांच्या विरोधात नाही.

Web Title: Manoj Jarange Exclusive: "We are fighting for rights; this time 5 times the society will strike in Mumbai!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.