अंतरवालीत साखळी उपोषण, मुंबईत देणार धडक; मनोज जरांगेंनी आंदोलनाची दिशा बदलली
By विजय मुंडे | Updated: February 8, 2025 11:27 IST2025-02-08T11:26:54+5:302025-02-08T11:27:35+5:30
आम्ही मुंबईतही आंदोलन करणार असून, त्यासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्कच्या जागेची पाहणी केली जाणार: मनोज जरांगे

अंतरवालीत साखळी उपोषण, मुंबईत देणार धडक; मनोज जरांगेंनी आंदोलनाची दिशा बदलली
जालना : उपोषण सोडून १२-१३ दिवस झाले तरी दिलेल्या आश्वासनातील एकाही आश्वासनाची शासनाने पूर्तता केलेली नाही. उपोषण सोडविताना आश्वासने द्यायची आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष करायचे, असे शासनाचे सुरू आहे. त्यामुळे आता अंतरवाली सराटीत १५ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण साखळी उपोषण सुरू होणार असून, त्याचे लोण राज्यभरात पसरणार आहे. आम्ही मुंबईतही आंदोलन करणार असून, त्यासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्कच्या जागेची पाहणी केली जाणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, दस्तावेज अभ्यासासाठी अभ्यासकाची नियुक्ती करावी, गॅझेट लागू करावे, एसीबीसीच्या विषयावर निर्णय घेणे अशा पाच ते सहा मागण्या तात्काळ सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आ. सुरेश धस यांच्या मार्फत दिले होते. परंतु, उपोषण सोडून १२ ते १३ दिवस झाले तरी एकही मागणी मान्य केलेली नाही, असे जरांगे म्हणाले.
मुंबईत धडक, राज्यभर आंदोलन
पहिल्या कॅबिनेटमध्ये मागण्यांवर काहीही झालेल नाही आता होणाऱ्या दुसऱ्या कॅबिनेटमध्ये काय होईल हे माहिती नाही. आम्ही आमच्या मागण्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. परंतु, त्यापूर्वी अंतरवाली सराटीत आता साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. राज्यातील गावा-गावात हे आंदोलन उभा राहणार आहे. शांततेचे आंदोलन काय असते हे मुख्यमंत्र्यांना यावेळी पहायला मिळेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.