ट्रक अपघाताचा बनाव करून केली सळई लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 00:52 IST2019-12-09T00:52:10+5:302019-12-09T00:52:47+5:30
ट्रक पलटी झाल्याचा आणि सळई चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या चालकाला चंदनझिरा पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी अटक केली होती

ट्रक अपघाताचा बनाव करून केली सळई लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ट्रक पलटी झाल्याचा आणि सळई चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या चालकाला चंदनझिरा पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी अटक केली होती. अटकेतील चालकाकडे केलेल्या चौकशीनंतर धोंडराई व रामनगर तांडा (जि.बीड) शिवारातून चोरीस गेलेली व घटनास्थळी असलेली अशी एकूण ११ टन सळई चंदनझिरा पोलिसांनी शनिवारी जप्त केली आहे.
जालना येथील संजय दुर्गाप्रसाद करवा यांच्या ट्रान्स्पोर्टमधून १३ नोव्हेंबर रोजी ट्रकमध्ये (क्र.एम.एच.१६- टी. ५३१३) ११ टन सळई भरण्यात आली होती. ही सळई कोल्हापूर येथे पोहोच करण्यासाठी चालक कृष्णा गुलाब संत (रा. भोजगाव ता. गेवराई जि.बीड) हा ट्रक घेऊन गेला होता. मात्र, सांगली- सोलापूर मार्गावर ट्रकचा अपघात झाल्याची माहिती चालक संत याने ट्रक मालकाला दिली. त्यानंतर करवा यांनी चालकाला सतत फोन लावला तरी संपर्क होत नसल्याने करवा यांना संशय आला. त्यांनी या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि शामसुंदर कौठाळे यांनी ट्रकचा अपघात झालेल्या घटनास्थळाकडे पथकाला पाठविले.
तपासाधिकारी अविनाश नरवडे, कर्मचारी कृष्णा भडांगे, नंदकुमार दांडगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
नातेवाईकांच्या शेतात टाकली होती सळई
चालक कृष्णा संत याने माल घेऊन कोल्हापूरला जातानाच ट्रकमधील काही टन सळई नातेवाईकांच्या शेतात नेऊन टाकली होती. अपघातस्थळी असलेल्या ट्रकमध्ये काही टन सळई होती. चालकाने सळई लंपास केल्याची माहिती मिळाल्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करून सळई चोरीचा बनाव चालकाने केल्याचा पर्दाफाश केला.
पोलीस कोठडी
चालक संत याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला वाढीव पोलीस कोठडी सुनावली असून, त्याला ९ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.