खऱ्या गरजवंतच 'लाडकी बहीण', लवकरच योजनेतील त्रुटी दूर करणार: अजित पवार
By विजय मुंडे | Updated: January 20, 2025 11:38 IST2025-01-20T11:37:23+5:302025-01-20T11:38:22+5:30
घाई गडबडीत योजनेतील त्रुटी तशाच राहिल्या होत्या. त्या आता दूर केल्या जातील

खऱ्या गरजवंतच 'लाडकी बहीण', लवकरच योजनेतील त्रुटी दूर करणार: अजित पवार
जालना : दीड हजार रूपयांचे महत्त्व ज्या महिलांना माहिती आहे, ज्या खऱ्या गरजू आहेत,अशा महिलांसाठीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. त्यामुळे योजनेतील त्रुटी दूर करीत पगारी घेणाऱ्या, इन्कमटॅक्स भरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली. निवडणूक जिंकल्यानंतर योजना बंद करतील, असा आरोप विरोधकांनी केला. परंतु, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चेक महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द केला आहे. २६ जानेवारीपासून महिलांच्या खात्यावर पैसे पडतील. परंतु, घाई गडबडीत योजनेतील त्रुटी तशाच राहिल्या होत्या. त्या आता दूर केल्या जातील, अशी स्पष्टोक्ती पवार यांनी दिली.
चांगले काम करा, तुमच्या इच्छा पूर्ण करू
पक्षात ज्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जातो, ते स्वच्छ प्रतिमेचे असावेत. कोणावरही काही आरोप झाले तर उजवा-डावा न पाहता संबंधितावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील. शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी महायुती सरकार काम करेल. येणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्थांत चांगले काम करा, तुमच्या इच्छा पूर्ण करू, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.