मालदीवमधील सांस्कृतिक स्पर्धेत जालन्याच्या घुगेंना पॅराडाईज पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:53 IST2019-07-31T00:53:43+5:302019-07-31T00:53:57+5:30
लायन्स क्लब आॅफ जालनाचा शपथग्रहण सोहळा अध्यक्ष श्याम लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच मालदीव येथे पार पडला

मालदीवमधील सांस्कृतिक स्पर्धेत जालन्याच्या घुगेंना पॅराडाईज पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लायन्स क्लब आॅफ जालनाचा शपथग्रहण सोहळा अध्यक्ष श्याम लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच मालदीव येथे पार पडला. तेथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक स्पर्धेत जालन्यातील कुसुम घुगेंना उत्कृष्ट सादरी करण्याबद्दल पॅराडाईज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
मालदीव येथे व्यवस्थापकीय मंडळाने मिस पॅराडाईज ही स्पर्धा आयोजित केली होती.
तेथे सहभागी झालेल्या २४ देशांतील पर्यटकांमधून पाच वेगवेगळ्या देशातील पर्यटकांची दिवसभर निरीक्षण केल्यानंतर या स्पर्धेसाठी निवड केली. त्यामध्ये लायन्स क्लब आॅफ जालन्याच्या कुसुम जगत घुगे याही होत्या. त्यांची या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापकीय मंडळाने निवड केली.
व्यवस्थापकीय मंडळाने या स्पर्धेसाठी अत्यंत कठीण पाच फेऱ्या ठेवण्यात आल्या होत्या. या पाचही फेऱ्यांमध्ये कुसुम घुगे यांनी भारतीय महिला संस्कृतीचे अत्यंत उत्कृष्ट असे प्रदर्शन करून आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची सर्वांगाने झलक दाखवली.
या त्यांच्या सादरीकरणाने परीक्षकांसह या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विविध देशांतील प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेतील पाच फे-यांपैकी चार फे-यांमध्ये त्यांनी अव्वल क्रमांक मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला.
प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचा मालदीवच्या व्यवस्थापकीय मंडळ व परिक्षकांनी त्यांना विशिष्ट भेटवस्तू व पुरस्कार देऊन सन्मानित केले.
कुसुम घुगेंच्या या यशाबद्दल त्यांचे लायन्स परिवारासह अन्य मित्र परिवारांकडून स्वागत होत आहे.