जालना : ॲट्रासिटीच्या प्रकरणात दोन लाख रुपयांची लाच घेणे तसेच एका हॉस्पिटलमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी जालन्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांना निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाले.
कडवंची येथील एका प्रगतशील शेतकऱ्याविरुद्ध ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात त्यांना अटक न करण्यासाठी खिरडकर यांनी आधी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु तडजोडीनंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील दोन लाख रुपये हे आधी देण्याचे निश्चित झाले होेते. या प्रकरणी तक्रारदाराने पुणे येथील एसीबीकडे खिरडकर आणि अन्य दोन पोलिसांची तक्रार केली होती. त्यानुसार २० मे रोजी जालना तालुक्यातील कडवंची येथे एसीबीने सापळा लावून दोन लाख रुपयांच्या लाचप्रकरणी खिरडकरांना अटक केली होती.
दरम्यान, ९ एप्रिल रोजी जालन्यातील एका हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्याचा आरोप ठेवून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना बेदम मारहाण केली होती. या दोन्ही आरोपांवरून खिरडकर यांना निलंबित केल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली. खिरडकरांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्याच्या गृह खात्याकडे पाठविण्यात आला होता. युवकाला मारहाण प्रकरणात या आधी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, उपनिरीक्षक कदम यांच्यासह चार पोलीस निलंबित झाले आहेत.