जालना बाजारपेठ समालोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST2021-05-24T04:28:43+5:302021-05-24T04:28:43+5:30
जालना : बाजारपेठेत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.* मात्र ग्राहकी नसल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. ...

जालना बाजारपेठ समालोचन
जालना : बाजारपेठेत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.* मात्र ग्राहकी नसल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. दररोज लागणाऱ्या २२ अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींवर सरकारची बारीक नजर आहे.* त्यामुळे या वस्तुमालांमध्ये जास्त तेजी-मंदीची शक्यता नाही. आयात तसेच खाद्यतेलाशी संबंधित व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक ग्राहक सचिवांनी सोमवारी बोलावली आहे.* या बैठकीत ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.*
सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केंद्र सरकारने २२ जीवनावश्यक वस्तू, विशेषत: सर्व प्रकारच्या डाळी, तेल, तेलबिया, अन्न, दूध आदींच्या किमतींवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कोरोना साथीच्या काळात सामान्य लोकांना दैनंदिन वापरासाठी आवश्यक असणाऱ्या पुरेशा वस्तू वाजवी दरात मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. डाळींच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मूग, उडीद आणि तुरीचा समावेश मोफत आयातीच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.
सध्या उन्हाळी मुगाची आवक दररोज २५ पोती इतकी असून भाव ५५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सरत्या आठवड्यात उडदाची आवकच झाली नसून भाव ३५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज ३०० पोती इतकी असून भाव ६००० ते ६५०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. हरभऱ्याची आवक दररोज ६०० पोती इतकी असून भाव ४७०० ते ४८७५ रुपये प्रति क्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज ३०० पोती इतकी असून भाव ६९०० ते ७३०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. हरभरा डाळीचे दर ६१०० ते ६५००, तूरडाळ ९००० ते १००००, मूगडाळ ९००० ते १००००, मसूरडाळ ७००० ते ८५०० आणि उडीद डाळीचे दर ९००० ते १०००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
ग्राहक विभागाच्या सचिवांनी सोमवार २४ मे रोजी आयात करणारे व्यापारी तसेच खाद्य तेलाशी संबंधित सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांची बैठक बोलावली आहे. खाद्य तेलांच्या किमती नियंत्रणात कशा आणता येतील या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असून भारताला तेल उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर कसे बनवता येईल या विषयावरदेखील चर्चा होणार आहे. तेल उत्पादनाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाल्यास देशाची मोठी आर्थिक बचत होईल, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल व युवकांना रोजगार मोठ्या प्रमाणात मिळेल असा सरकारचा विचार आहे.
पामतेलाचे भाव १४५००, सूर्यफूल तेल १९०००, सरकी तेल १६००० आणि सोयाबीन तेलाचे दर १५८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
राज्यात २५ लाख टन साखरेपासून इथेनाॅल बनविण्याच्या हालचाली सुरू असून यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारची परवानगी मागितली आहे. केंद्राची परवानगी मिळताच साखरेपासून इथेनाॅलची निर्मिती सुरू होईल. केंद्रीय परिवहनमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरीचे संकेत दिले आहेत. या प्रस्तावानुसार केंद्र सरकार हे इथेनाॅल ६२.२५ रुपये या दराने खरेदी करेल. यामुळे खुल्या बाजारात साखरेची विक्री कमी होईल आणि कारखानदारांना चांगले दर मिळतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.