जालना बाजारपेठ समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST2021-04-05T04:26:45+5:302021-04-05T04:26:45+5:30

सर्व प्रकारचे तेल, सोयाबीन आणि सरकी ढेपमध्ये विक्रमी तेजी जालना : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उसळलेल्या किमती, उत्पादन कमी आणि मागणी ...

Jalna Market Criticism | जालना बाजारपेठ समालोचन

जालना बाजारपेठ समालोचन

सर्व प्रकारचे तेल, सोयाबीन आणि सरकी ढेपमध्ये विक्रमी तेजी

जालना : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उसळलेल्या किमती, उत्पादन कमी आणि मागणी जास्त तसेच कोरोना लाॅकडाऊनमुळे नेहमीचीच झालेली अस्थिरता यामुळे सर्व प्रकारचे तेल, सोयाबीन आणि सरकी ढेपच्या दरात विक्रमी तेजी आली. वनस्पती तूप, हरभरा तसेच सोने-चांदीच्या दरातही तेजी आली आहे.

खाद्यतेलाचे दर दिवसेंदिवस भडकत असताना केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्र्यांनी तेलाच्या दरातील तेजीकडे सरकार लक्ष देईल, असे सांगितले. केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर बाजारात एक दिवस मोठी उलथापालथ बघायला मिळाली. वायदा बाजारात तेलाचे दर दिवसभर मंदीकडे झुकलेले होते. मात्र, दुसऱ्या दिवसापासून सर्व प्रकारचे खाद्यतेल पुन्हा महागले. परदेशातून खाद्यतेलांवरील स्वावलंबन कमी करण्यासाठी देशात तेलबिया उत्पादन वाढवण्यावर सरकार भर देत आहे.

यावेळी खाद्यतेलाचे आयात शुल्क सरकार कमी करू शकत नाही. कारण सध्या शेतकरी बाजारपेठेत आपले पीक विकत आहेत. आयात शुल्कात कपात केल्यामुळे बाजारातील पिकांचे दर खाली येऊ शकतात आणि सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. अमेरिकेत बायो डिझेलची मागणी वाढल्यामुळे सोयाबीन तेलाचे दर भडकले, असेही बोलले जाते. याशिवाय तेलांच्या तेजी-मंदीवर सटोरियांची एकतर्फी पकड आहे. त्यामुळे तेलाच्या दरात तेजी कायम राहील, असे बोलले जाते. सोयाबीन तेलाचे दर १३,७००, सरकी तेल १४,०००, पामतेल १३,३००, सूर्यफूल तेल १८,००० आणि करडी तेलाचे दर १८,५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. वनस्पती तुपाचे दर १५०० ते १८०० रुपये प्रति डबा असे आहेत.

सोयाबीनचे नवे पीक येण्यास आणखी सहा महिने बाकी आहे. सध्या आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे सोयाबीनच्या दरात या वर्षात विक्रमी तेजी आली. मागील तीन महिन्यांत सोयाबीनचे दर तीस टक्क्यांनी वाढले. चीनमध्ये सोयाबीनची मागणी सतत वाढत असून भारतात सोयाबीनची कमतरता आहे. त्यामुळेही सोयाबीनमध्ये तेजी आली. सध्या सोयाबीनची आवक दररोज ३०० पोते इतकी असून क्विंटलमागे ३०० रुपयांची तेजी आल्यानंतर भाव ५९०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कपाशीचा भाव कमी आहे. त्यामुळे यावर्षी भारतातून कापसाची निर्यात मोठ्या प्रमाणावर झाली. सध्या कापसाच्या दरात विक्रमी तेजी आहे. मार्चअखेरपर्यंत स्टाॅक कमी असल्यामुळे देशभरातील ७५ टक्के जिनिंग मिल्स बंद कराव्या लागल्या. त्यामुळे सरकी ढेप, सरकी तेल आणि कापसाच्या दरात तेजी आली. सध्या कापसाचे दर २९५० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

गव्हाचे दर १६६० ते २३००, ज्वारी १४०० ते ३६००, बाजरी ११८० ते १६००, मका १२०० ते १४००, तूर ६४०० ते ६८००, मूग ४८०० ते ६५००, हरभरा ४५०० ते ४७५०, उडद ४००० ते ६७००, काबुली चना ४५०० ते ७०००, सूर्यफूल ५७०० ते ६१००, साखर ३२५० ते ३४००, गुळ २६५० ते ३२००, हरभरा डाळ ५८०० ते ६०००, तूर डाळ ९००० ते ९८००, मूग डाळ ९००० ते ९५००, मसूर डाळ ६५०० ते ७०००, उडद डाळ ९००० ते १०,०००, शेंगदाणा ९००० ते १०००० आणि साबूदाण्याचे दर ४००० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

Web Title: Jalna Market Criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.