जालना जिल्हा रूग्णालयाकडून १४ रूग्णवाहिकांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:51 IST2019-12-19T00:50:55+5:302019-12-19T00:51:50+5:30
जिल्हा रूग्णालय प्रशासनाने १४ रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला

जालना जिल्हा रूग्णालयाकडून १४ रूग्णवाहिकांचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा रूग्णालयासह इतर रूग्णालयातील अपुऱ्या रूग्णवाहिकांमुळे रूग्णांचे होणारे हाल याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा रूग्णालय प्रशासनाने १४ रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला आहे. शिवाय सोनोग्राफी मशीन खरेदीसाठीही पाठपुरावा केला जात आहे.
जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयासह ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णवाहिकांचा मोठा अभाव आहे. १०८ च्या रूग्णवाहिकांची संख्याही अपुरी आहे. त्यात कार्यरत रूग्णवाहिका या १५ वर्षांपूर्वीच्या असून, अनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे या बंद असतात. परिणामी खासगी रूग्णवाहिकांचा आधार घेऊन रूग्णांना इतर रूग्णालयात जाण्याची वेळ येत होती. याबाबत ‘लोकमत’ने ‘रूग्णांचा ‘गोल्डन आवर’ जुनाट रूग्णवाहिकेवर!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा रूग्णालय प्रशासनाने नवीन रूग्णवाहिका खरेदीसाठी जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव दाखल केला आहे. यात जिल्हा रूग्णालयासाठी दोन, महिला रूग्णालयासाठी दोन, उपजिल्हा रूग्णालयासाठी एक व ग्रामीण रूग्णालयांसाठी ९ रूग्णवाहिका खरेदी करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. या रूग्णवाहिका खरेदीसाठी साधारणत: पावणेदोन कोटीवर रक्कम लागणार आहे.
या सोबतच जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयांसाठी चार नवीन सोनोग्राफी मशीन खरेदी करता याव्यात, यासाठीही निधीची मागणी करण्यात आली आहे.
लहान बालकांसाठी व्हेंटलेलेटर मशीनसह इतर आधुनिक सोयी-सुविधांसाठीही निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीसह इतर शासकीय फंडातून ही रक्कम उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या जिल्हा रूग्णालयासह इतर रूग्णालयातील सोयी-सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्याची गरज आहे.
जिल्हा रूग्णालय, महिला रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयासह इतर रूग्णालयांमध्ये नवीन खाटांची गरज आहे. काही ठिकाणी खाटांची संख्या आणि रूग्ण संख्या यात सतत तफावत दिसून येते. तर काही ठिकाणी खाटा जुन्या झालेल्या आहेत. त्यामुळे नवीन २०० खाटांसाठी निधी मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कार्डिअॅक रूग्णवाहिकेचा प्रस्ताव
वरिष्ठ स्तरावरून आलेल्या निर्देशानुसार जिल्हा रूग्णालय प्रशासनाने नवीन दोन कार्डिअॅक रूग्णवाहिका मिळाव्यात, म्हणून यापूर्वीच वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव दाखल केलेला आहे. वरिष्ठ स्तरावरून याला मंजुरी मिळेल, असे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.