जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर निलंबित; मंत्री तानाजी सावंतांचे आदेश
By विजय मुंडे | Updated: December 27, 2022 15:39 IST2022-12-27T15:39:02+5:302022-12-27T15:39:32+5:30
आ. नारायण कुचे यांचा तारांकित प्रश्न; आरोग्य सचिवांमार्फत होणार चौकशी

जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर निलंबित; मंत्री तानाजी सावंतांचे आदेश
जालना : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जालन्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. विवेक खतगावकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले. कोरोना काळातील साहित्य खरेदी, महिलांबाबतचे गैरवर्तन आदींबाबत बदनापूरचे आ. नारायण कुचे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरावेळी हे आदेश देण्यात आले. डॉ. खतगावकर यांची आरोग्य सचिवांमार्फत चौकशी करण्याचेही आदेश आरोग्यमंत्री सावंत यांनी दिले.
बदनापूरचे आ. नारायण कुचे यांनी हिवाळी अधिवेशनात डॉ. विवेक खतगावकर यांच्या भ्रष्टाचार व गैरवर्तणुकीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केले होते. कोरोना कालावधीत ॲंटिजन किट, पीपीई किट, थर्मल गन, सॅनिटायझर, मास्क आदी विविध साहित्यांची अवाजवी खरेदी करणे, केवळ १५ दिवस वापर करून ते साहित्य गोदामात धूळखात पडणे, अव्वाच्या सव्वा दराने निकृष्ट दर्जाचे साहित्य खरेदी करणे, खरेदी केलेले अनेक साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत न पोहोचणे, खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार आदींबाबत आ. कुचे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. महिला कर्मचाऱ्यांशी डाॅ. खतगावकर हे अरेरावी, गैरवर्तन करीत असल्याची तक्रार करीत आजच डॉ. खतगावकर यांना निलंबित करणार का? औरंगाबाद येथे झालेली चौकशी पुन्हा सुरू करणार का? महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून गैरवर्तनाची चौकशी करणार का? डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील या सेवानिवृत्तांना गरज नसताना कंत्राटी तत्त्वावर कर्तव्यावर घेतले असून, त्यांना कामावरून काढणार का? असे प्रश्न उपस्थित केले होते.
आ. कुचे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी डॉ. विवेक खतगावकर यांना आजच निलंबित करीत असल्याचे सांगितले. तसेच आरोग्य सचिव, दोन संचालकांमार्फत चौकशी समिती नेमणे, महिला डॉक्टरांचा सहभाग असलेल्या पथकामार्फत गैरवर्तनाची चौकशी करण्यास समिती नेमण्याचे आदेश दिले. शिवाय कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या डॉ. सतीश पवार, डॉ. अर्चना पाटील यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याचेही सावंत यांनी यावेळी सांगितले.
येताना साखर घेऊन या
सकाळी आल्यानंतर संध्याकाळी या, असे कर्मचाऱ्यांना सांगितले जाते आणि येताना साखर घेऊन या, असे सूचित केले जाते. साखर एक किलो आणा, दोन किलो आणा, शंभर किलो आणा, अशी बोलण्याची पद्धत असल्याचे सांगत आ. नारायण कुचे यांनी डॉ. विवेक खतगावकर यांच्या भ्रष्टाचाराचा पाढाच यावेळी वाचला.
तत्कालीन आरोग्य मंत्र्यांवर निशाणा
डॉ. विवेक खतगावकर यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या. परंतु, तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी डॉ. खतगावकर यांना पाठीशी घातले. ते आमच्या जिल्ह्यातील होते असे सांगत आ. कुचे यांनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर थेट निशाणा साधला.