जळगाव जिल्ह्यात भाजप तालुकाध्यक्ष निवडीत २० पैकी केवळ तीन अध्यक्षांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:06 IST2019-12-27T12:05:51+5:302019-12-27T12:06:24+5:30
अनेक ठिकाणी कोणी माघार घेण्यास तयार नसल्याने रखडल्या निवडी

जळगाव जिल्ह्यात भाजप तालुकाध्यक्ष निवडीत २० पैकी केवळ तीन अध्यक्षांची निवड
जळगाव : भाजप तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात तालुकानिहाय कार्यक्रम निश्चित होऊन २२ ते २६ डिसेंबरपर्यंत प्रत्येक तालुक्यात बैठका होऊनही २० पैकी केवळ तीनच तालुकाध्यक्षांची निवड झाली आहे. अनेक ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज असल्याने व कोणी माघार घेण्यास तयार नसल्याने बहुतांश ठिकाणी निवड होऊ शकल्या नाही. त्यामुळे या संदर्भात आता कोअर कमिटी निर्णय घेणार असून त्या विषयी जिल्हा पातळीवर बैठक होणार आहे.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम लांबत असून डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप तालुकाध्यक्षांतीत निवड पूर्ण झालेली नाही. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत होणारी जिल्हाध्यक्ष निवडही लांबणीवर पडली आहे. या संघटनात्मक निवडणुकीअंतर्गत तालुकाध्यक्ष निवडीच्या तारखा ठरविण्यासंदर्भात १८ रोजी जळगाव येथे भाजप कार्यालयात बैठक झाली व तालुकाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यात २२ ते २६ डिसेंबरपर्यंत सर्व तालुकाध्यक्षांची निवड होणार होती. मात्र २६ रोजी शेवटच्या दिवशीदेखील भुसावळ शहर व ग्रामीणची निवड होऊ शकली नाही.
निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार २२ ते २४ डिसेंबर या तीन दिवसादरम्यान एकाही ठिकाणी तालुकाध्यक्षांची निवड होऊ शकली नाही. अखेर २५ डिसेंबर रोजी रावेर, यावल व जामनेर या तालुकाध्यक्षांच्या निवडीसंदर्भात झालेल्या बैठकीत या तीनच तालुकाध्यक्षांची निवड होऊ शकली. यात यावलच्या तालुकाध्यक्षपदी योगेश फेगडे, जामनेरला चंद्रकांत बाविस्कर (फेर निवड) व रावेर तालुकाध्यक्षपदी राजन लासूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माघार घेण्यास कोणी तयार नाही
चाळीसगाव, जळगाव ग्रामीण, भुसावळ शहर व ग्रामीण या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज असल्याने व कोणी माघार घेण्यास तयार नसल्याने तेथे तालुकाध्यक्षांची निवड होऊ शकली नाही. या संदर्भात कोअर कमिटीकडे निर्णय सोपविला असून या साठी जिल्हा पातळीवर बैठक होणार आहे. त्यानंतर या निवडी होतील.
बोदवड व मुक्ताईनगरात खडसेंच्या निर्णयाची प्रतीक्षा
बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यात बुथ समित्या अपूर्ण असून तेथे त्या पूर्ण करण्यात आल्या. मात्र यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रतीक्षा होती. आता खडसे जिल्ह्यात आले असून या दोन्ही तालुक्यातील निवडीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळाली.
बुथ समित्या अपूर्ण
चोपडा तालुक्यात बुुथ समित्या पूर्ण नसल्याने त्या ठिकाणी तालुकाध्यक्ष निवड होऊ शकली नाही. अशाच प्रकारे अमळनेर येथेही निवड रखडली असून तेथे २८ रोजी निवड केली जाणार आहे. अशीच स्थिती बहुतांश ठिकाणी असल्याने तालुकाध्यक्षांची निवड रखडल्या आहेत.