Jalana: पोहणे शिकायचे म्हणून गेले अन् चुलत भावंडांचे मृतदेहच घरी आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:26 IST2025-10-15T20:24:22+5:302025-10-15T20:26:07+5:30
वाढवणा तांडा येथील चुलत भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

Jalana: पोहणे शिकायचे म्हणून गेले अन् चुलत भावंडांचे मृतदेहच घरी आले
टेंभुर्णी (जि.जालना) : पोहायला शिकण्यासाठी तलावात गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेहच घरी आल्याने पालकांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. ही घटना वाढोणा तांडा (ता.जाफराबाद) शिवारात मंगळवारी दुपारी घडली. ओम गणेश आढे (वय ११) व कुणाल कृष्णा आढे (१३) अशी मयतांची नावे आहे.
वाढोणा तांडा येथील ओम आढे व कुणाल आढे ही मुलं देऊळगाव राजा येथील शाळेत शिकत होती. मंगळवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर ते दोघे गावाजवळील एका तलावात पोहायला गेले. दोघांनाही पोहणे येत नसल्याने त्या ठिकाणी दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी धाव घेऊन दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच दोघांचाही करुण मृत्यू झाला होता. यावेळी ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यावेळी घटनास्थळी नातेवाईकांच्या गगनभेदी आक्रोशाने सर्वांना गहिवरून आले.
घटनास्थळी टेंभुर्णी पोलिस स्टेशनचे पीएसआय बाबासाहेब खार्डे यांच्यासह पो.कॉ. मांटे, शिवरकर, माने, गावंडे, टेकाळे, म्हस्के आदींची उपस्थिती होती. त्यानंतर दोन्ही मृतदेह टेंभुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल वाघ यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत टेंभुर्णी पोलिस स्टेशनला ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद झाली असून घटनेचा तपास बीट जमादार देशपांडे करत आहे. शवविच्छेदनानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात दोघा चिमुकल्यांवर वाढोणा तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकुलता एक मुलगा काळाने हिरावला
कुणाल हा इयत्ता सातवीमध्ये तर ओम हा पाचवा वर्गात शिकत होता. सध्या परीक्षा सुरू असल्याने ते दोघे लवकर घरी आले होते. घरच्यांना न सांगता पोहणे शिकायचे म्हणून दोघेही परस्पर पोहायला निघून गेले होते. दोघेही थोडे खोलवर पाण्यात गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत किनाऱ्यावर असलेल्या ओमच्या लहान भावाने पळत येऊन गावात ही घटना सांगितली. कुणाल हा एकुलता एक मुलगा तर ओमला आणखी एक छोटा भाऊ आहे. दरम्यान, ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
तांड्यावर चूल पेटली नाही
वाढोणा तांडा हे ३५ उंबरठ्याचे लमाणी समाजाचे गाव. या गावात प्रथमच अशी दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले होते. दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाहताच संपूर्ण गावाने एकच आक्रोश केला. या दिवशी वाढोण्यात कोणाचीही चूल पेटली नाही. प्रत्येक जण या लेकरांच्या आठवणी सांगत अश्रूंना मोकळी वाट करून देत होता. परिसरातील वाढोणा गाव व आजूबाजूच्या तांड्यातील ग्रामस्थांनी धाव घेऊन या गावाला व परिवाराचा धीर दिला.