वडीगोद्री/ अंबड ( जालना ): सध्या सोशल मीडियावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते राजेश टोपे हे भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरलेला आहे. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत टोपे यांनी आज यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, "मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत जे काही मेसेज किंवा अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत, त्या सर्व निराधार, खोट्या आणि निव्वळ अफवा आहेत. मी कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटलेलो देखील नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) सोडणार नाही. गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून मी काम करत आहे आणि यापुढेही तेच काम मनापासून करत राहणार आहे," असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चर्चांवर पूर्णविराम दिलाटोपे हे मराठवाड्यातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षाचे महत्वाचे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या भाजपात जाण्याच्या शक्यतेवरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी वेळेवर खुलासा करत त्या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. टोपे यांनी यापूर्वीही अनेक वेळा पक्षनिष्ठा कायम ठेवत आपली निष्ठा शरद पवार यांच्याप्रती असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या या स्पष्ट वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
शरद पवार यांचे विश्वासू म्हणून परिचितमाजी मंत्री राजेश टोपे हे आरोग्य मंत्री म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटने कडून घेण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी राजकीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. कोरोना काळात पायाला भिंगरी लावून ते महाराष्ट्रभर फिरले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली यामुळे ते महाराष्ट्रभर परिचित असून महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी स्थान निर्माण केली आहे. पंचवीस वर्ष विधानसभेचे सदस्य राहिले आहेत तसेच अनेक वेळा त्यांनी विविध खात्याच्या मंत्रि पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांची राज्य पातळीवर एक अभ्यासू नेते म्हणून ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षासोबत एकनिष्ठ असून शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात.