Jalana: हृदयस्पर्शी! शिक्षिकेच्या बदलीमुळे विद्यार्थी ढसाढसा रडले, शाळेचं गेटही बंद केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:38 IST2025-09-11T18:36:37+5:302025-09-11T18:38:10+5:30
दगडवाडी झेडपी शाळेतील शिक्षिका जीजा वाघ यांची बदली; निरोप देताना विद्यार्थी ढसाढसा रडले

Jalana: हृदयस्पर्शी! शिक्षिकेच्या बदलीमुळे विद्यार्थी ढसाढसा रडले, शाळेचं गेटही बंद केलं
भोकरदन ( जालना) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी ता.भोकरदन येथील विद्यार्थी प्रिय शिक्षिका जिजा वाघ यांची तालुक्यातील देहेड येथे नुकतीच बदली झाल्यामुळे त्यांना दिनांक 11 सप्टेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले. त्यांना निरोप देतांना भाऊक होऊन सर्व विद्यार्थी ढसाढसा रडायला लागले. विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्य गेटही बंद करून घेत शिक्षिका वाघ यांना, आम्हाला सोडून जाऊ नका' असे म्हणत आग्रह धरला. हे दृश्य पाहून उपस्थित पालक, शिक्षकांचेही डोळे पाणावले. विद्यार्थ्यांचे प्रेम पाहून शिक्षिका वाघ यांना देखील शाळेतून पाय बाहेर काढताना अश्रु थांबवता आले नाही. दगडवाडी शाळेत गेल्या सात वर्षांपासून केलेल्या कार्याची हीच पावती असून यापेक्षा दूसरा मोठा पुरस्कार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी या शाळेला "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " हा पुरस्कार 2023-24 मध्ये मिळाला होता. यामध्ये शिक्षका जिजा वाघ यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच महादिप परीक्षेत जिल्हा स्तरावर विद्यार्थी यशस्वी होऊन विद्यार्थीनीसह विमान प्रवास करून अंतराळ संशोधन संस्था बैगलोर व श्रीहरिकोटा येथे अभ्यास दौरा केलेला आहे. ''शालेय जिवनात मुलांसाठी शिक्षक किती महत्त्वाचे असतात हे दिसून आले, तनमनधनाने विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थी जन्मभर विसरत नसतात'', अशा भावना शिक्षिका वाघ यांनी व्यक्त केल्या.
शिक्षिका जिजा वाघ यांची देहेड येथे बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी 11 सप्टेंबर रोजी दगडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आपल्या आवडत्या शिक्षिका आता येथून जाणार असे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला. त्यावेळी उपस्थित शिक्षकांचे सुद्धा डोळे भारावून आले होते. शिक्षिका जिजा वाघ या शाळेतून जाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी गेट बंद केले होते. मात्र शिक्षकांनी गेट उघडल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला. शिक्षिका जिजा वाघ यांनी विद्यार्थ्यांनाजवळ घेत शांत केले आणि सर्वांना शुभेच्छा देत जड अंतकरणाने शाळा परिसर सोडला.