कानफोडीच्या ‘बिजल्या’ची ११ लाखांत विक्री; शेतकरी पवन राठोड एक बैल विकून झाले लखपती
By अझहर शेख | Updated: November 6, 2025 13:18 IST2025-11-06T13:18:20+5:302025-11-06T13:18:53+5:30
बिजल्या हा शंकरपटातील बैल असल्यामुळे त्याचे मूल्य अधिक होते

कानफोडीच्या ‘बिजल्या’ची ११ लाखांत विक्री; शेतकरी पवन राठोड एक बैल विकून झाले लखपती
अझहर शेख, लोकमत न्यूज नेटवर्क, वाटूर (जि. जालना): मंठा तालुक्यातील कानफोडी येथील शेतकरी पवन राठोड हे एक बैल विकून लखपती झाले आहेत. या कुशल शेतकऱ्याने पट्ट्यावरील धावणाऱ्या बैलाचे पालन-पोषण केले आणि त्याला उत्कृष्टरीत्या प्रशिक्षित करून तयार केले. त्यानंतर तो ‘बिजल्या’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्यात घोड्यालाही घाम फोडणारी ताकद असल्याचे बोलले जात होते.
बिजल्या हा शंकरपटातील बैल असल्यामुळे त्याचे मूल्य अधिक होते. अखेर सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल ११ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केला.
बिजल्याने ३० पैकी जिंकल्या २५ शर्यती
शंकरपटात शर्यतीत घोड्यांसोबत भाग घेतला आणि पहिले स्थान पटकावले. जालना, वाशीम, जिंतूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील ३० पैकी २५ शर्यतींमध्ये बिजल्याने प्रथम क्रमांक मिळवला असून, ३ ते ४ लाख रुपये कमाई केली आहे.
सोशल मीडियावर ३ हजार फॉलोअर्स
‘बिजल्या’ आता सोशल मीडियावरही चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर रील पोस्ट होताच ३ हजार फॉलोअर्स झाले. ५ सेकंदात ६० पॉइंट धावत मराठवाड्यात तरी अद्वितीय ठरला आहे.
तामिळनाडूतून ५१ हजारांना केली होती खरेदी
राठोड यांनी १० महिन्यांचा असताना तामिळनाडू येथून ५१ हजारांत त्याची खरेदी केली होती. १५ महिन्यांत त्याला आहारात रोज ३ लिटर दूध, १०० ग्रॅम बदाम, एक किलो उडीदडाळ, सायंकाळी मका व गहू भरडा दिला. दर दोन दिवसांनी गरम पाण्याने अंघोळ घालत निगा राखली. बैलावर प्रेम, नियमित प्रशिक्षण आणि काळजी घेतल्यामुळेच बिजल्या इतका मौल्यवान झाला. मेहनत आणि चिकाटीने एखाद्या प्राणी किंवा शेतीतील उत्पादनातून मोठा लाभ मिळवता येतो, असे पवन राठोड यांनी सांगितले.