अवैध वाळू उत्खनन; ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 01:03 IST2019-12-27T01:02:55+5:302019-12-27T01:03:14+5:30
गेवराई तालुका हद्दीत गोरी- गंधारी (ता.अंबड) शिवारातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ८ वाळू तस्करांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला

अवैध वाळू उत्खनन; ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : गेवराई तालुका हद्दीत गोरी- गंधारी (ता.अंबड) शिवारातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ८ वाळू तस्करांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने बळेगाव ते गोंदी (ता.अंबड) पर्यंतच्या अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल, गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि हनुमंत वारे यांनी बळेगाव ते गोंदी पर्यंतच्या अवैधवाळू तस्करांविरूध्द कारवाईचा सपाटा लावला आहे.
अशातच शहागडचे काही अवैध वाळू तस्कर सावरगाव (ता. गेवराई) हद्दीतून व गोरी- गंधारी (ता.अंबड) येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करत होते.
गोपनीय विभागाकडून माहिती घेऊन उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल, सपोनि हनुमंत वारे यांनी गोरी-गंधारी नदीपात्रात छापा टाकला.
यावेळी ८ ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अवैध वाळू उत्खनन करताना आढळून आले. उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल यांच्या मार्गदर्शनाखाली
तलाठी अभिजीत देशमुख यांच्या फिर्यादीवरून विलास खेडेकर, लखन परदेशी, शाहरूख मकबूल शेख, फिरोज मकबूल शहा, मुक्तार अकबर शहा, मोबीन अकबर शहा, (रा.सर्व शहागड), माऊली खरात (रा.गोंदी), दादा माळी (रा. सावरगाव ता.गेवराई) या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अवैध वाळू असा एकूण ५६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास जमादार भास्कर आहेर करत आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासन व महसूलच्या पथकांनी अवैध वाळू वाहतुकीविरूध्द कारवाईचा बडगा उगारल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.