आठ रूपयांपासून ते शंभर रूपयांपर्यंत विमा शेतकऱ्यांच्या हाती; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:56 IST2018-06-26T19:55:28+5:302018-06-26T19:56:10+5:30
काही शेतकऱ्यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रूपयांची तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे.

आठ रूपयांपासून ते शंभर रूपयांपर्यंत विमा शेतकऱ्यांच्या हाती; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा !
- प्रकाश मिरगे
जाफराबाद (जालना ) : येथील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण व्हावे, म्हणून शंभर रूपयांपासून ते हजारो रूपयांपर्यंत पीक विम्याचा भरणा केला. त्यानूसार नूकसान भरपाई म्हणून बँकामध्ये पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येत आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या नावे अपेक्षित तर काहींना एक, आठ, शंभर, दोनशे, पाचशे, हजार रूपयांची रक्कम जमा होत असल्याचे उघडकीस आले आहे.
शेतकऱ्यांनी दिवसभर रांगेत उभे राहून पीक विम्याचा भरणा केला. भरणा केलेल्या रकमेपेक्षा किमान दोन पट रक्कम मिळणे आवश्यक असताना ती रक्कम मिळत नसल्याने विमाधारक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे. पीक विम्याच्या नावाखाली बँकांनी जवळपास ५६ हजार शेतकऱ्यांचा पीक विमा जमा केला.
हिवराबळी येथील भाऊराव किसान लोखंडे यांनी चारशे आठ रूपयांचा विमा भरला. परंतु त्यांना फक्त आठ रूपयाचा विमा मिळाला. नळविहारा येथील भारत मोरे या शेतकऱ्यांनी पीक विमा म्हणून ६७७ रूपये भरले. त्यांच्याही खात्यात आठ रूपये जमा झाले.तसेच शरद मोरे यांनी ११८४ रूपयांचा विमा भरला त्यांच्या खात्यातर २०० रूपये जमा झाले.
शेतकऱ्यांच्या बँकेत चकरा
आठ, दहा, शंभर, दोनशे, पाचशे रूपये बँकेच्या खात्यात जमा होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. विमा रक्कम कमी आली, याचा शोध घेण्यासाठी शेतकरी बँकेकडे चकरा मारत आहे. मात्र बँक अधिकारी शेतकऱ्यांना काहीच सांगत नसल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या विमा संरक्षण रकमेचा जाफराबाद तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
बँकांना आकड्यांचा ताळमेळ लागेना
जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्यांचा किती पीकविमा स्वीकारला यांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचा नेमका फायदा किती होणार याची आकडेवारी कुठेच मिळत नाही. जूनच्या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करा अशा सूचना शासनाच्या वतीने बँकांना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही बँकांनी रक्कम जमा केली नाही.