अस्वलाच्या हल्ल्यात भाविक जबर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:48 IST2018-09-04T00:47:23+5:302018-09-04T00:48:01+5:30
भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचादेव येथून सावळदबारा येथे पायी दर्शनासाठी जात असलेल्या एका भाविकावर अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

अस्वलाच्या हल्ल्यात भाविक जबर जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचादेव येथून सावळदबारा येथे पायी दर्शनासाठी जात असलेल्या एका भाविकावर अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मनोहर बाबा पंजाबी (६८) हे गंभीर जखमी झाले आहेत.
श्रावण महिना असल्याने श्रीक्षेत्र जाळीचा देव आणि सावळदबारा येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. अजिंठ्याच्या पर्वत रांगेत डोंगराळ भागात वसलेले श्रीक्षेत्र जाळीचा सावळदबारा गाव आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाचा भाग असल्याने वन्य प्राण्यांचा वावर असतो. मनोहर पंजाबी सोमवारी सकाळी पायी जाळीचादेव येथून सावळदबारा येथील मंदिरात पायी दर्शनासाठी गेले होते. मंदिराच्या पायथ्याशी दबा धरुन बसलेल्या अस्वलाने अचानक पंजाबी यांच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले. प्रसंगावधान राखून पंजाबी यांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी धाव घेत अस्वलाच्या तावडीतून त्यांना सोडविले. आवाजामुळे अस्वल जंगलात पळून गेले. हाताला आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने पंजाबी यांना नागरिकांनी तातडीने बुलडाणा येथे रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला दहा टाके पडले आहे. प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाढत्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.