यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात होणार वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:39 IST2018-04-28T00:39:00+5:302018-04-28T00:39:00+5:30
येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पे-यात १७ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.

यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात होणार वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात मागील वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात घट झाल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकरी सोयाबीन पेरणीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पे-यात १७ हजार हेक्टरने वाढ अपेक्षित आहे.
जिल्ह्यात यंदा सहा लाख आठ हजार ६३५ हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत खरीप क्षेत्रात २० हजार हेक्टरने वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षी जिल्ह्यात दोन लाख ७९ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. परिणामी कापूस उत्पादन घटल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. बोंडअळी बाधित शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, पंचनामे पूर्ण होऊन चार महिने उलटूनही शेतक-यांच्या एकही रुपयांची मदत मिळालेली नाही. शिवाय बोलगार्ड दोन हे कपाशी तंत्रज्ञान कमकुवत झाल्याने कपाशीवर या खरिपातही बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादनावर मोठा खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्यास नुकसान नको म्हणून शेतकरी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका या कमी कालावधीच्या नगदी पिकांचा विचार करत आहेत.