मन्याड धरणाची उंची वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:31 IST2019-07-29T21:30:13+5:302019-07-29T21:31:24+5:30
चाळीसगाव तालुक्यातील २२ खेड्यांसाठी वरदान ठरलेल्या मन्याड धरणाची उंची दोन मीटरने वाढवावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

मन्याड धरणाची उंची वाढवा
चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील २२ खेड्यांसाठी वरदान ठरलेल्या मन्याड धरणाची उंची दोन मीटरने वाढवावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जि.प.चे माजी सदस्य किशोर माधवराव पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ५ आॅगस्टपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून, तहसील कार्यालय परिसरात उपोषण केले जाणार आहे. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्यासह २२ खेड्यातील प्रमुख शेतकरी उपस्थित होते.
१९७२ मध्ये मन्याड धरण उभारले गेले. या धरणावर तालुक्यातील २२ खेड्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा समावेश आहे. १९०५ दशलक्षघनफूट क्षमता असलेले मन्याड अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने यंदाही कोरडेठाक आहे. निम्मा पावसाळा संपत आला तरी मन्याडमध्ये अद्यापही पाणी आलेले नाही. परिणामी धरण क्षेत्रातील २२ खेड्यांवर दुष्काळाचे सावट आहे.
किशोर पाटील यांनी परिसरातील २२ खेड्यांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. २२ ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन मन्याडची उंची वाढविण्याच्या आंदोलनाचा बिगूल वाजविला आहे.
गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने मन्याड परिसरात तीव्र दुष्काळ आहे. शेती क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. चारा-पाणी नसल्याने गुरांचेही हाल होत आहे. मन्याड सोबतच नारपार योजनादेखील पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पत्रपरिषदेला बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील, संचालक कल्याण पाटील, प्रकाश पाटील, पं.स.चे राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, विलास पाटील, दीपक पाटील, अरुण नागरे, छगन जाधव, नीलेश पाटील, धनंजय पाटील, हेमराज पाटील आदी उपस्थित होते. उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व संबंधित विभागांना पाठविण्यात आली आहे.