मस्साजोग प्रकरणात सरकार छुपा अजेंडा चालवत आहे; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 19:35 IST2025-02-26T19:33:03+5:302025-02-26T19:35:45+5:30
फक्त कागद दाखवून भावनिक करून दिशाभूल करण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत

मस्साजोग प्रकरणात सरकार छुपा अजेंडा चालवत आहे; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : मस्साजोग प्रकरणात सरकार छुपा अजेंडा चालवत आहे असा गंभीर आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. मागच्या तीन महिन्यात कोणाला सहआरोपी केले का ? असा सवाल करत जरांगे यांनी मुख्यमंत्री केवळ कागद दाखवून भावनिक करून दिशाभूल करत असल्याची टीका केली. ते अंतरवाली सराटी येथे आज सायंकाळी प्रसार मांध्यमांशी संवाद साधत होते.
जरांगे पुढे म्हणाले, मागच्या दोन महिन्यापासून निकम साहेबाच्या नियुक्तीची मागणी सुरू होती. शेवटी आंदोलनच करावं लागलं. देशमुख कुटुंब आणि मस्साजोग गावकरी ठाम आहेत की नाही त्याबाबत मला काही माहिती नाही, परंतु उज्वल निकम साहेबांची जी नियुक्ती झाली ती चांगली गोष्ट आहे. परंतु यामध्ये विशेष महत्त्वाचा आहे ते म्हणजे, आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी कधी करणार? पोलीस सहआरोपी झाले का? नाही, खंडणी आणि खून करणाऱ्याला साथ देणारे कोणी सहआरोपी झाले का? तर नाही. गाड्या वाले झाले का? पैसा पुरवणारे सह आरोपी झाले का? नाही झाले. आळंदीला कोण गेल होत? त्यामध्ये कोणी सहआरोपी आहेत का ? धनंजय देशमुख यांना धमकी देणारे सह आरोपी झाले का? अजिबात नाही, तर मला एक म्हणायचं आहे, या प्रकरणांमध्ये मग प्रगती काय झाली? असा सवाल जरांगे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून एक टोळी तयार केली
इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण बोलताना जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून एक टोळी तयार केलेली आहे. एकाने बोलायचं, महापुरुषांच्या टिंगल करायच्या,अपमान करायचा आणि सांभाळायचं पण त्यांनीच. याचा निषेध करून जनतेच भागणार नाही. तर या बोलणाऱ्या लोकांना इथून पुढं नीट करावं लागणार आहे. तेव्हाच कुठेतरी हे थांबेल नाहीतर हे थांबणार नाही. बोलणार आणि माफी मागणार हा सरळ सरळ आता पळून जाण्याचा मार्ग झालेला आहे. इथून पुढे याचा बंदोबस्त करायचा, अशा लोकांना डायरेक्ट नीट करावा लागणार आहे, असा इशारा जरांगे यांनी दिला.