वेळीच उपचार केल्यास थायरॉईडपासूनचे धोके टाळणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST2021-05-25T04:33:51+5:302021-05-25T04:33:51+5:30
जालना : मानवी शरिरात ग्रंथींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. एकूणच शरिराची वाढ, त्यातील ऊर्जा तसेच सुदृढ आरोग्यात ग्रंथींचा सिंहाचा ...

वेळीच उपचार केल्यास थायरॉईडपासूनचे धोके टाळणे शक्य
जालना : मानवी शरिरात ग्रंथींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. एकूणच शरिराची वाढ, त्यातील ऊर्जा तसेच सुदृढ आरोग्यात ग्रंथींचा सिंहाचा वाटा असतो. परंतु, याच ग्रंथींचे प्रमाण हे क्षमतेपक्षा अधिक वाढले आणि कमी झाले तरी मानवी आरोग्य धोक्यात येते. परंतु, थायरॉईड हा आजार जीवघेणा नसून, वेळीच तज्ज्ञांकडून उपचार घेऊन नियमित औषधांचे सेवन केल्यास यातून मुक्त होता येते, अशी माहिती थायरॉईड तथा ईएनटी तज्ज्ञ डॉ. संदीप अग्रवाल यांनी दिली. दिनांक २५ मे हा जागतिक थायरॉईड दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. यानिमित्ताने संदीप अग्रवाल यांनी या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हा आजार म्हणजे दुसरा-तिसरा काही नसून, तुमच्या गळ्याजवळील ग्रंथींमधील द्रव्याच्या प्रमाणात क्षमतेपेक्षा वाढ झाली आणि आवश्यक असलेल्या टक्क्यांपेक्षा घट झाल्यास त्याचे परिणाम हे तुमच्या शरिरावर दिसतात. थायरॉईडची लक्षणे ही चटकन लक्षात येत नाहीत. परंतु, हातावर, चेहऱ्यावर तसेच पायांवर सूज येणे, अचानकपणे केस गळती होणे, अचानक वजन वाढणे, कमी होणे ही लक्षणे असतात. विशेष करून हा आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
थायरॉईडवर अनेक खात्रीशीर औषधे आहेत, परंतु अनेकजण एक ते दोनवेळेस स्वत:ची तपासणी करून नंतर दिलेली औषधेही नियमितपणे घेत नाहीत. त्यामुळे हा आजार पुन्हा डोके वर काढतो. थायरॉईडचे प्रमाण अधिक वाढल्यास वंध्यत्वही येऊ शकते. त्यातच ग्रंथींमधील द्रव्यांचे प्रमाण हे कमी-अधिक झाल्यास उंची खुंटणे, बौध्दिक वाढ न होणे ही आजाराची लक्षणे आहेत. सध्या देशात हायपो थायराडीझम हा आजार सर्वसामान्य झाला आहे. त्यामुळे या आजाराविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. थायरॉईड म्हणजे मराठीतील ‘गलगंड’ असे या आजाराचे नाव आहे.
संदीप अग्रवाल यांनी कान, नाक, घशासोबतच पीएचएफ अर्थात पब्लिक हेल्थ फाऊंडेशन यासह अन्य महत्त्वाच्या संस्थांमधून थायरॉईडबद्दलचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
चौकट
देशात सहा कोटींपेक्षा अधिक रूग्ण
एकट्या भारताचा विचार केल्यास जवळपास सहा कोटींपेक्षा अधिक रूग्ण या आजाराने ग्रासले आहेत. यात विशेष करून ३० वर्षांपेक्षा अधिकचे वय असलेल्या महिलांमध्ये हा आजार चटकन बळावतो. या आजाराने महिलांमध्ये येणारी मासिक पाळी लांबणे किंवा जवळ येण्याचे प्रकार सर्रास घडतात. हा आजार मेंदूच्या गतिमानतेवरही आघात करू शकतो. परंतु, तो जीवघेणा नसल्याने नागरिकांनी याची धास्त न घेता काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी म्हणजे हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे घेण्याच्या वेळा आणि दिवस पाळलेच पाहिजेत.
- डॉ. संदीप अग्रवाल, थायरॉईड तज्ज्ञ, जालना