बीडीओंची सही पाहिजे तर दारूचे दोन खंबे द्या; दोन लाचखोर ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई

By विजय मुंडे  | Updated: July 10, 2023 20:41 IST2023-07-10T20:39:50+5:302023-07-10T20:41:08+5:30

या प्रकरणात सोमवारी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

If signature of BDOsis required, give two bottles of alcohol; Action taken against two village servants who demanded bribe of alcohol | बीडीओंची सही पाहिजे तर दारूचे दोन खंबे द्या; दोन लाचखोर ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई

बीडीओंची सही पाहिजे तर दारूचे दोन खंबे द्या; दोन लाचखोर ग्रामसेवकांवर एसीबीची कारवाई

जालना : बांधकामाच्या एमबीवर व निधी अदा करण्याच्या परवानगी लेटरवर बीडीओंची सही हवी असेल तर सात हजार रूपये किंवा दारूचे दोन खंबे देण्याची मागणी करणाऱ्या आणि लाचेस प्रोत्साहन देणाऱ्या दोन ग्रामसेवकांविरूद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या प्रकरणात सोमवारी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थ कृष्णा घोडके (वय- ४२ मांजरगाव ता. बदनापूर), पुष्पा महाजन अंबुलगे (वय- ४० रा. उजैनपुरी ता. बदनापूर) असे कारवाई झालेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत. बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील भूमीगत नाली बांधकामाचे एमबीवर व बांधकाम पूर्ण झाल्याने उर्वरित एक लाख ४८ हजार ४६७ रूपये मजुरांना व साहित्य देणाऱ्या दुकानदारांना निधी अदा करण्याच्या परवानगी पत्रावर गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते. ती स्वाक्षरी आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे पंचायत समितीतील लांडगे व घोडके हे दहा हजार रूपये लाचेची मागणी करीत होते. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

पथकाने २० जून रोजी मागणीबाबत पडताळणी केली. त्यावेळी मांजरगावचे ग्रामसेवक सिध्दार्थ घाेडके यांनी पंचासमक्ष तुमचे काम रिक्वेस्ट करून आणून दिले आहे. त्यासाठी ११ हजार रूपये द्यावे लागतील. ते शक्य नसेल तर सहा सात हजार रूपये लगेच द्यावे लागतील. नाही तर दोन ब्लॅक डॉगचे दोन हजारांना मिळणारे दोन खांबे द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यावेळी घोडके यांनी ग्रामसेविका अंबुलगे यांना बोलावून तुमचे किती पसेंटेज असते मॅडम सरपंचांना सांगा असे सांगितले.

अंबुलगे यांनी एक लाखाला बीडीओ यांना चार हजार रूपये, विस्ताराधिकाऱ्यांना दीड ते दोन हजार रूपये, लांडगे क्लार्क यांना ५०० रूपये द्यावे लागतील, असे सांगत तक्रारदारास लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. या प्रकरणात लाच मागणारे ग्रामसेवक सिद्धार्थ रामकृष्ण घोडके, प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामसेविका पुष्पा महाजन अंबुलगे यांच्याविरूद्ध सोमवारी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप अटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक किरण बिडवे, ज्ञानदेव जुंबड, शिवाजी जमधडे, गजानन घायवट, गणेश बुजाडे, कृष्णा देठे, गणेश चेके, जावेद शेख, आत्माराम डोईफोडे, गजानन कांबळे यांच्या पथकाने केली.

Web Title: If signature of BDOsis required, give two bottles of alcohol; Action taken against two village servants who demanded bribe of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.