IAS श्रीकृष्ण पांचाळ यांची बदली, अशिमा मित्तल जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:58 IST2025-07-31T12:57:44+5:302025-07-31T12:58:48+5:30
सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून बदली केली आहे.

IAS श्रीकृष्ण पांचाळ यांची बदली, अशिमा मित्तल जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी
जालना : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची बुधवारी ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी २०२३ मध्ये जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला होता. गत दोन-अडीच वर्षांत त्यांनी रेशीम शेती वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्याशिवाय बालविवाह मुक्त जिल्हा, ॲग्रो प्रोसेसिंग युनिट, ई-ऑफिस, सस्ती अदालत यासारखे उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. त्याशिवाय शहरातील सीना-कुंडलिका नदीपात्राची स्वच्छता मोहीम व इतर उपक्रमांतही जिल्हाधिकारी पांचाळ यांचा सहभाग राहिला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बुधवारी पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून बदली केली आहे.
तर नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांची जालन्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मित्तल यांनी नाशिक येथे सीईओ म्हणून काम करताना विविध उपक्रम राबविले असून, शिक्षण विभागातील त्यांचे उपक्रम राज्यभरात चर्चिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे कामकाज सुधारण्यासाठी मित्तल यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.