गृहनिर्माण सोसायट्यांसाठी मानीव अभिहस्तांतरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:48+5:302021-01-08T05:39:48+5:30
जालना : शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत सहकारी संस्था सहायक निबंधक कार्यालयामार्फत मानीव ...

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी मानीव अभिहस्तांतरण मोहीम
जालना : शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत सहकारी संस्था सहायक निबंधक कार्यालयामार्फत मानीव अभिहस्तांतरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत इमारती किंवा गृहनिर्माण सहकारी संस्थांना जागेच्या मालकीहक्काचा पुरावा मिळणार आहे. त्यामुळे इमारती, जागेचा विकास संबंधित नागरिकांना करता येणार आहे.
राज्यातील बहुतांश फ्लॉटधारक गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण केलेले नाही. या पार्श्वभूमीवर फ्लॉटधारक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजासंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी व विविध प्रकरच्या तक्रारींसंदर्भात १ ते १५ जानेवारी या कालावधीत सहकारी संस्था, सहायक निबंधक कार्यालयामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत संबंधित फ्लॉटधारक ओनर्स सहकारी संस्थांना विकासकाकडून जमिनीचे कायदेशीर हक्क प्रदान करून देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. संस्थेच्या जमिनीची मालकी ही संस्थेचीच असावी यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.
मानीव अभिहस्तांतरण अर्जासोबत नमुना सातमधील अर्ज, गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, डीड ऑफ डिक्लेरेशनची प्रत, अर्जदार संस्थेचा तपशील व संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभांमध्ये मानवी हस्तांतरण करण्यासंदर्भात केलेल्या ठरावाची प्रत, मिळकत पत्रिकांची तीन महिन्यांच्या आतील उतारा, संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची विहित नमुन्यातील यादी, सहकारी गृहनिर्माण संस्थेने अभिहस्तांतरण करून देण्यासाठी महाराष्ट्र वेश्म अधिनियम १९७० अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस आदी कागदपत्रे सहकारी संस्था सहायक निबंधक कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे.
तर मानीव अभिहस्तांतरण अर्जासोबत नियोजन, सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, तसेच भोगवाटा प्रमाणपत्र, संबंधित संस्थेकडे भोगवाटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे, तसेच सदर इमारतीसंदर्भात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या, दायित्वे स्वीकारण्यास तयार असल्याचे, तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे भोगवाटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व- प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे, तसेच दोन हजार रुपयांची कोर्ट फी स्टॅम्प किंवा ऑनलाइन फी व संस्थेची कागदपत्रे खरी असल्याबाबत अर्जदाराचे स्व-प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे आहे.
...असे होणार फायदे
मानीव अभिहस्तांतरणानंतर संस्थेला जमिनीची व इमारतीची संपूर्ण मालकी प्राप्त होणार आहे. त्यानंतर संस्था इमारतीचा पुनर्विकास करू शकते. संस्था मालमत्ता तारण ठेवून निधी उभा करू शकते. संस्था वाढीव एफ.एस.आय., टी.डी.आर.ई.चे लाभ घेऊ शकते.
बैठकीचे आयोजन
मानीव अभिहस्तांतरण मोहिमेंतर्गत शहरातील गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व विकासकांची सहकारी संस्था सहायक निबंधक कार्यालयात गुरुवारी बैठक होणार आहे. या बैठकीस संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.