महापोलीस अॅपद्वारे ‘हायटेक’ कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:16 IST2018-02-06T00:20:39+5:302018-02-06T11:16:50+5:30
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक नवे बदल केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘महापोलीस’ अॅपचा वापर करण्यात येत आहे.

महापोलीस अॅपद्वारे ‘हायटेक’ कामकाज
जालना : पोलीस दलातील अधिकारी, कर्मचा-यांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक नवे बदल केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘महापोलीस’ अॅपचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक कर्मचा-याच्या अँड्रॉईड मोबाईलमध्ये असलेल्या या अॅपमुळे सेवेसंबंधीची कामे अधिक गतीने होण्यास मदत होत आहे.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्या पुढाकारातून जालना, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प म्हणून महापोलीस अॅप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अँड्रॉईड मोबाईलचा वापर करणा-या अधिकारी व कर्मचा-यांना हे अॅप डाऊनलोड करून आपल्या सेवार्थ क्रमांकाचा वापर करून त्याचा वापर करता येणार आहे. पोलीस दलात काम करणा-या कर्मचा-यांना रजा अर्ज, वेतन, निवासस्थानांसंबंधी अडचणी, बक्षिसे व अन्य प्रशासकीय बाबींसाठी लेखी अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतरही अनेक दिवस उलटूनही योग्य कार्यवाही होत नाही. अगोदरच कायदा सुव्यवस्थेचा ताण असणा-या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांना बाबूगिरीमुळे आपल्याच हक्कांच्या सुविधा वेळेत मिळत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. या प्रकारांना आळा बसावा, तसेच बदलत्या परिस्थितीनुसार आॅनलाईन कामकाजांना प्राधान्य दिले जावे. प्रत्येक कर्मचा-याने केलेल्या अर्जाची माहिती वरिष्ठांना थेट पाहता यावी, या उद्देशाने महापोलीस अॅप तयार करण्यात आले आहे.
सेवेसंबंधीची कामे झाली सुलभ
महापोलीस अॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केल्यानंतर सेवार्थ क्रमांक व जन्म तारखेची नोंदणी केल्यानंतर अधिकारी व कर्मचा-यांना, नेमणूक असलेल्या पोलीस ठाण्याचे नाव, पद, कामाची वेळ, संपूर्ण माहिती अॅपमध्ये पाहायला मिळते. अॅपच्या मदतीने तक्रार नोंदवणे, अर्ज करणे, आपण केलेल्या तक्रारीची स्थिती पाहणे, रजा अर्ज करणे, तो मंजूर झाला की नाही हे पाहणे इ. कामे आॅनलाईन करता येतात. वरिष्ठ अधिका-यांनाही अर्जांची माहिती मोबाईलवर पाहता येते. त्यामुळे कामे अधिक गतीने होत आहेत.
आठ ठाण्यांची आयएसओकडे वाटचाल
स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयानंतर शहरातील सदर बाजार, तालुका ठाणे, चंदनझिरा, अंबड, हसनाबाद, आष्टी, गोंदी, बदनापूर ही ठाणीही आयएसओ करण्यात येणार आहेत. त्यासाठी तपास कामांचा वेगाने निपटारा करण्याबरोबरच प्रशासकीय पातळीवरील कामात सुधारणा केल्या जात आहेत.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्या पुढाकारातून महापोलीस अॅप हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. जालन्यातही याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांना आपल्या सेवेसंबंधीच्या गरजा, अडचणी मांडणे अधिक सुलभ होत आहे.
- रामनाथ पोकळे, पोलीस अधीक्षक,जालना.