जामखेड, परतूरसह परिसरात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:37 IST2019-07-20T00:36:45+5:302019-07-20T00:37:15+5:30
मागील दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी शहरासह जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली. आष्टी, जामखेड, परतूर परिसरात दमदार पाऊस झाला.

जामखेड, परतूरसह परिसरात दमदार पाऊस
जालना : मागील दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी शहरासह जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली. आष्टी, जामखेड, परतूर परिसरात दमदार पाऊस झाला. तर इतरत्र तुरळक प्रमाणात पाऊस झाला असून, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
जालना शहरासह परिसरात अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अंबड तालुक्यातील जामखेड परिसरात शुक्रवारी दुपारी एक तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे घामुवंती नदी, लेंडी ओढ्याला पूर आल्याने नदीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. परतूर शहरासह परिसरातही शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. वातावरणात सकाळपासूनच उकाडा होता. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. शहरासह बामणी, शेरोडा, कावजवळा, मसला, वरफळ, वरफळ वाडी, रोहिणा, पाडळी आदी शिवारातही पावसाने हजेरी लावली.
राजूरसह परिसरात पावसाने हजेरी लावली असून, या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी पिके माना टाकू लागली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी पंधरा ते वीस मिनिटे पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला. मात्र, पाणीटंचाई निवारणार्थ मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.