गॅरेज लाईनला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:33 IST2018-01-08T23:33:29+5:302018-01-08T23:33:41+5:30
जालना : शहरातील बसस्थानक परिसरातील राऊतनगरमधील गॅरेज लाईनला रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत आठ दुकाने जळाली. या घटनेत जुन्या वाहन्यांच्या ...

गॅरेज लाईनला भीषण आग
जालना : शहरातील बसस्थानक परिसरातील राऊतनगरमधील गॅरेज लाईनला रविवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत आठ दुकाने जळाली. या घटनेत जुन्या वाहन्यांच्या महागड्या मशिनरी व अन्य साहित्य जळाल्याने सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
जुन्या मोंढ्याच्या पाठीमागील बाजूस राऊतनगरमधील जागा अशोक भल्लार यांनी काही व्यक्तींना भाडेतत्त्वावर दिली आहे. या ठिकाणी बहुतांश जणांनी गॅरेज थाटले असून, किरकोळ विक्रेते रात्रीला हातगाड्याही उभ्या करतात. रविवारी मध्यरात्री एका गॅरेज दुकानाला आग लागली. आॅईल, डायनोमा, टायर इ. साहित्यामुळे आग भडकली. त्यामुळे एकमेकांना लागून असलेली आठ गॅरेजची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गॅरेज लाईनच्या समोरील बाजूस असलेल्या शासकीय धान्य गोदामाचेही आगीमुळे नुकसान झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे डी.एम.जाधव घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाचे अब्दुल बासेत, व्ही. के. बनसोडे, कमलसिंग राजपूत, आर.के.बनसोडे, सागर गडकरी, विठ्ठल कांबळे, अशोक वाघमारे, दत्ता मोरे, सुरेंद्र ठाकूर यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परतूरचा एक बंबही घटनास्थळी पोहोचला. उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह स्थानिकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. चार बंबच्या मदतीने तीन तासांत आग नियंत्रणात आली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक जळीत म्हणून नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल सुधाकर मगरे तपास करीत आहेत.
------------
मशिनरी, बॅट-या, इलेक्ट्रॉनिक साहित्य खाक
आगीच्या या घटनेत किरकोळ कापड विक्रेते बालाजी विठ्ठल दावत व विनोद रामूल अलशेटी यांचे हातगाडीवरील रेडिमेड कपडे जळाल्याने एक लाखाचे नुकसान झाले. सुपर भारत बॅटरी या दुकानातील साहित्य जळाले. शेख फिरोज अख्तर, शेख युनूस यांच्या गॅरेजचे एक लाखाचे नुकसान झाले. नजीर खान, मजर खान या जुन्या वाहन विक्री व्यवसाय करणा-या दोघांच्या जुन्या कारच्या महागड्या मशिनरी, कागदपत्रे जळाल्याने सुमारे वीस लाखांचे नुकसान झाले. तर हॉटेल संगीतामधील साहित्याचेही नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.