आरोग्य केंद्राची असून अडचण नसून खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:32 IST2021-08-26T04:32:04+5:302021-08-26T04:32:04+5:30
माहोरा : आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे माहोरा (ता. जाफराबाद) येथील आरोग्य केंद्राची इमारत, असून अडचण नसून खोळंबा ...

आरोग्य केंद्राची असून अडचण नसून खोळंबा
माहोरा : आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे माहोरा (ता. जाफराबाद) येथील आरोग्य केंद्राची इमारत, असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. येथील रिक्त पदांमुळे गावातील रुग्णांना खासगी रुग्णालयात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे लाखो रूपये खर्च करून आरोग्य केंद्राची भव्य- दिव्य इमारत उभी करण्यात आली आहे. परंतु, या केंद्रातील एक निवासी वैद्यकीय अधिकारी, एनएमएम दोन, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक दोन, शिपाई दोन, सफाई कामगार ही पदे रिक्त आहेत. आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा कमी पडत आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी अनेकवेळा नागरिकांची गैरसोय होते. अनेकांना खासगी रुग्णालय किंवा इतर शहरातील शासकीय रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. या रुग्णालयात अद्ययावत शवविच्छेदनगृह नाही, मुबलक औषधांचा साठा उपलब्ध नाही. विशेषत: रुग्णवाहिका नसल्याने गंभीर स्थितीत रुग्णांसह नातेवाईकांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. कोरोना प्रतिबंधक लस व्यवस्थित ठेवण्यासाठी सततचा वीजपुरवठा गरजेचा आहे. परंतु, या रुग्णालयासाठी स्वतंत्र विद्युत डीपी नाही. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. शिवाय पिण्याचे पाणी साचविण्याची सोय नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन रिक्त पदे भरण्यासह इतर सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी हाेत आहे.
कोट
माहोरा आरोग्य केंद्रात एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णवाहिका नसल्याने अडचणीत भर पडत आहे. रुग्णांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासह येथील समस्या तातडीने सोडवाव्यात.
वैशाली कासोद, सरपंच
रूग्णालयाचा फोटो