माजलगावहून आलेला साडेअकरा लाखांचा गुटखा परतूर तालुक्यात जप्त
By दिपक ढोले | Updated: November 29, 2022 19:23 IST2022-11-29T19:23:17+5:302022-11-29T19:23:31+5:30
एसपींच्या विशेष पथकाच्या कारवाईत दोघे ताब्यात

माजलगावहून आलेला साडेअकरा लाखांचा गुटखा परतूर तालुक्यात जप्त
जालना : एका वाहनाद्वारे माजलगावहून परतूरकडे येणारा ११ लाख ६६ हजार ८०० रुपये किमतीचा गुटखा एसपींच्या पथकाने सोमवारी रात्री परतूर तालुक्यातील आष्टीजवळील परतवाडीजवळ पकडला. या वेळी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. शेख आमेर शेख निजाम (२६ रा. परतूर) व मुजाहिद ऊर्फ मुज्जु गुलाब खान (३५ रा. परतूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
एका टाटा इन्ट्रा वाहनाद्वारे माजलगावहून परतूरकडे राज्यात बंदी असलेला गुटखा येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह आष्टी ते परतूर रोडवरील परतवाडी येथे सापळा रचला. सदरील वाहनाला थांबवून शेख आमेर शेख निजाम व मुजाहिद ऊर्फ मुज्जु गुलाब खान या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी ११ लाख ६६ हजार ८०० रुपये किमतीचा राजनिवास पान मसाला व जाफराणी जर्दा गुटखा जप्त केला. पोलिसांनी सदरील वाहन जप्त केले असून, आरोपींसह आष्टी पोलिसांकडे देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सपोनि. योगेश धोंडे, पोलीस अंबादास साबळे, गजू भोसले, लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे, सुभाष गावडे यांनी केली आहे.